कर्णबधिर मुलांना कथकचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ती कर्णबधिर मुले कथक नृत्याचे धडे गिरवण्यात दंग होती. संगीत ऐकू येत नसले तरी त्याचा अडसर त्यांना वाटत नव्हता. मार्गदर्शकांच्या खाणाखुणांवरून सहजपणे बदलणारी भावमुद्रा, अनुरूप पदन्यास घडत होता. योगासनांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध त्यांनी सामूहिकरीत्या साकारले.

पुणे - ती कर्णबधिर मुले कथक नृत्याचे धडे गिरवण्यात दंग होती. संगीत ऐकू येत नसले तरी त्याचा अडसर त्यांना वाटत नव्हता. मार्गदर्शकांच्या खाणाखुणांवरून सहजपणे बदलणारी भावमुद्रा, अनुरूप पदन्यास घडत होता. योगासनांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध त्यांनी सामूहिकरीत्या साकारले.

कॅम्प परिसरात ‘इंडियन रेड क्रॉस सोसायटी’ संचालित कर्णबधिर मुलांची शाळा आहे. तेथे ‘जागतिक कर्णबधिर सप्ताह’निमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याअंतर्गत विविध इयत्तांमधील मुले कलाविष्काराबरोबरच चित्र व शिल्पकलेचा आनंद लुटत आहेत.

मुख्याध्यापिका मनीषा डोंगरे म्हणाल्या, ‘आमच्या छोट्या विद्यार्थ्यांनी मजेशीर नाटुकलेही बसवले आहे. ससा- कासवाच्या शर्यतीची गोष्ट ते अभिनयातून मांडतात. मध्येच विश्रांती घेतल्यामुळे हरलेला ससा झालेला विद्यार्थी शेवटी प्रेक्षकांसमोर येतो. ‘मी हरलो’, असे निरागसपणे हावभावांतून सांगतो आणि कासवाचे अभिनंदन करतो, तेव्हा ही गोष्ट अधिक गोड वाटते.’’

रामायणातील फारशी प्रसिद्ध नसलेली पात्रे निवेदन करून नृत्यातून कथा पुढे नेत आहेत, अशी संरचना असलेला कार्यक्रम मुलांकडून बसवला जात आहे. गेली पंचवीस वर्षे कथकच्या माध्यमातून या मुलांचा विकास साधण्यासाठी शिल्पा दातार प्रयत्नशील आहेत. लवकरच हे नृत्यनाट्य रंगमंचावर येईल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deafening Student Workshop Learning