esakal | पुण्यातील ‘डेक्कन कॉलेज’ आर्थिक संकटात I Deccan College
sakal

बोलून बातमी शोधा

Deccan-College-Pune

पुण्यातील ‘डेक्कन कॉलेज’ आर्थिक संकटात

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे - प्राचीन इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व अशा क्षेत्रांतील मूलभूत संशोधनात देशाचा गौरव वाढवणारे आणि सध्या द्विशताब्दी वर्ष साजरे करणारे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ सध्या निधीअभावी आर्थिक संकटात सापडले आहे. विद्यापीठातील वास्तूच्या संवर्धनासह आवश्यक दुरुस्ती कामे आणि नव्याने उभारण्यात येणारे संग्रहालयाचे बांधकाम, यासाठी पुरेसा निधी मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता विद्यापीठाने खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

देशातील तिसरी क्रमांकाची सर्वात जुनी आणि राज्यातील पहिली शैक्षणिक संस्था असलेल्या ‘डेक्कन कॉलेज’ने ६ ऑक्टोबर २०२०मध्ये द्विशताब्दी वर्षात पदार्पण केले. व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमाद्वारे हे वर्ष साजरे करण्यात आले. आता पुढील आठवड्यात द्विशताब्दी वर्षाचा समारोप होत असताना डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातील विविध प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठाच्या आवारात दुर्मिळ पुरातत्वीय अवशेष आणि वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयाच्या उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव २०१८मध्ये पाठविला होता. त्याला देखील मंजुरी मिळाली होती. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून निधी येणे अपेक्षित होते. आतापर्यंत संग्रहालयाचे पायाभूत बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप निधी न मिळाल्याने संग्रहालयाचे उर्वरित काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली. पुणे महापालिकेच्या ‘हेरिटेज सेल’ अंतर्गत मिळणाऱ्या निधीतून सध्या विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन आणि दुरुस्ती काम सुरू असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

रखडलेल्या संग्रहालयाचे वैशिष्ट्ये :

- प्राचीन अश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुगीन हत्यारे, अवशेष पाहण्यासाठी असतील विविध दालने

- पाषाण युग, ताम्रयुग, लोहयुगातील वस्तूंचा संग्रह

- दुर्मिळ अवशेष, वस्तूंचे जतन आणि संवर्धनासाठी प्रयोगशाळा- हवामानानुसार नियंत्रण (क्लायमेटिक कंट्रोल) होणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा

- कार्यशाळा, कार्यक्रमासाठी छोटेखानी असेल स्वतंत्र दालन

‘जवळपास ११५ एकरावर विस्तारलेल्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातील दुरुस्ती कामे, जीर्णोद्धार करण्याचा मानस आहे. परंतु विद्यापीठ सध्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी खासगी संस्था, औद्योगिक क्षेत्रांची मदत घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’

- डॉ. प्रमोद पांडे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ

loading image
go to top