
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला असला, तरीही अधिष्ठाता नियुक्तीचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल,
पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत दोन दिवसांत निर्णय : डॉ. कारभारी काळे
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला असला, तरीही अधिष्ठाता नियुक्तीचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल,’ असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेले प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांचा कार्यकाळ कुलगुरूंच्या समवेत संपतो. त्यानुसार विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल गेल्या १८ मे रोजी संपला.
त्याचवेळी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, मानव्यविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांचा कार्यकाळ संपला. मात्र, हा कार्यकाळ संपून आठ दिवस झाले तरीही विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांच्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने ‘अधिष्ठात्यांची नियुक्ती अधांतरीच!’ अशा शीर्षकाने बुधवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांसह प्राथमिक बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतरही अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत विचारले असता येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे डॉ. काळे यांनी सांगितले.
‘विद्यापीठ कायद्यानुसारच कुलगुरू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपतो. त्यानुसार तो कार्यकाळ संपला आहे. दरम्यान, अधिष्ठाता नियुक्तीबाबत सर्व कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत. परंतु, येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर होईल.’
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Web Title: Decision Regarding Appointment Of Deans Of Pune University In Two Days Dr Karbhari Kale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..