पुणे : शाळा बंदच्या निर्णयात झाली घाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 शाळा बंद!
पुणे : शाळा बंदच्या निर्णयात झाली घाई

पुणे : शाळा बंदच्या निर्णयात झाली घाई

पुणे : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असला, तरी तातडीने शाळा बंद करण्याचा निर्णय घाईने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरात अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेले इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा बंद करावे लागले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना घरी राहून शिक्षण घ्यावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार असल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.(school news pune)

हेही वाचा: काँग्रेसने PM मोदींना मृत्यूच्या दाराशी नेलं: स्मृती इराणी

राज्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसह काही ठिकाणी पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असले, तरीही ते तितकेसे प्रभावी ठरत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सध्या शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. या वर्गांना विद्यार्थी-पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.(School news)

हेही वाचा: टीईटी गैरव्यवहार प्रकरणी कदमला न्यायालयीन कोठडी

‘‘इयत्ता पहिलीपासूनच्या शाळा सुरू होऊन १५ दिवसही झाले नाहीत आणि आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. खरंतर ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थी कोणीही समाधानी नव्हते. तात्पुरती सोय म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष शाळेत शिकविताना विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जाणीव शिक्षकांना झाली. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, स्थिती पूर्ववत आणण्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणच महत्त्वाचे आहे. अशात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रिया पुन्हा खंडित होणार आहे.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

हेही वाचा: Precautionary कोरोना डोस कोणता मिळणार? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

‘‘शाळा बंद करण्याचा निर्णय घाईने घेतला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जवळपास दीड वर्षाच्या अंतराने विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आले होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता कुठे लेखन, वाचनात रूळायला लागली होती. पण आता पुन्हा शिक्षणात खंड पडणार आहे. शाळा बंद करणे हा पर्याय नव्हता, तर त्याऐवजी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पर्यायी विचार करणे गरजेचे होते.’’

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ

‘‘शहरात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाणही चांगले होते. अशात शाळांमधील शिक्षणाची घडी पुन्हा विस्कळीत झाली आहे. सरसकट शाळा बंद केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने सरसकट सर्व शाळा बंद करण्याऐवजी त्या-त्या शाळांना काही प्रमाणात शाळांना अधिकार देणे अपेक्षित होते.’’

- एकनाथ बोरसे, मुख्याध्यापक, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स सेकंडरी स्कूल

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top