esakal | पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

बोलून बातमी शोधा

Decomposition project

पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - कोरोनामुळे शहरातील रूग्णालयांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती होत आहे. वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येक वेळेस पुरेशी यंत्रणा उपलब्ध असेलच असे नाही. आता पुणे शहराची पुढील १० वर्षाची गरज लक्षात घेता एक महत्त्वाकांक्षी जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

पास्को इन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स कंपनी आणि महापालिकेने जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विघटनाची क्षमता वाढविण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे शहरातच दररोज २१ टन जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रीया करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीच्या आवारात सुमारे एक एकर जागेत उभारण्यात येत असून, त्याचे काम ५० टक्के झाले आहे. कोरोनाच्या अनेक अडचणींमुळे सध्या या कामाचा वेग मंदावला आहे.

याबाबत महापालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नायक म्हणाल्या, की या प्रकल्पाच्या अद्ययावत मशिनरीच्या मंजुरीसाठी आयुक्तांमार्फत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली नसती, तर हा प्रकल्प आता पूर्ण तयार झाला असता.

हेही वाचा: बारामतीत कोरोनाचा कहर; प्रशासनाची परिक्षा

प्रकल्पाची गरज का?

- जैव वैद्यकीय कचऱ्याबरोबर कोरोनाशी निगडित कचऱ्यात सध्या वाढ

- शहरातील सुमारे ९५० रुग्णालये व त्यातील अंदाजे २१८ कोविड केअर सेंटरमधून कचऱ्याचे संकलन

- या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातील प्रकल्पावर ताण पडतो

-पर्यायाने हा कचरा मुंबई येथील तळोजा कचरा प्रकल्पात पाठविला जातो

- भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला

- यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

प्रकल्पाची सध्य स्थिती

-प्रकल्प पूर्ण होण्यास सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार

-प्रकल्पासाठी लागणाऱ्या यंत्रणांची ऑर्डर देण्यात आली आहे

-यामध्ये दोन इनसिनिरेशन व चार ऑटोक्लेव्ह मशिनच समावेश

हेही वाचा: राज्य सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा आणि वाटपावर नियंत्रण करावे : आढळराव पाटील

असा होणार फायदा

कचऱ्याला शहराबाहेर पाठविण्यासाठी येणारा वाहतूक खर्च वाचणार

महापालिकेचा वेळ आणि आर्थिक बचत होणार

अंदाजे १४ हजार ४०० किलोग्रॅम कचऱ्याची ‘इनसिनिरेशन’ क्षमता

सुमारे सात हजार किलोग्रॅम कचऱ्याची ‘ऑटोक्लेव्ह’ क्षमता

जैववैद्यकीय कचऱ्यात भर पडली आहे. या कचऱ्याच्या विघटनाची गरज लक्षात घेऊन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

- सुनील दंडवते, संचालक, पास्को कंपनी