esakal | बारामतीत कोरोनाचा कहर; प्रशासनाची परिक्षा

बोलून बातमी शोधा

cornavirus

बारामतीत कोरोनाचा कहर; प्रशासनाची परिक्षा

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : तब्बल 17 दिवस लॉकडाउन होऊनही बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यातच येत नसल्याने आता काळजी वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसात (ता. 20 आणि ता. 21) 670 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दुसरीकडे मृत्यूचा आकडाही सातत्याने कायमच राहत असल्याने तीही चिंतेचीच बाब ठरु लागली आहे. व्हेंटीलेटर्स व ऑक्सिजनचे बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरु आहे तर दुसरीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे संकटही कायमच आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची साखळी तुटता तुटत नसल्याने आता सर्वांनीच यात प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

बारामतीत दोन आठवड्यांहून अधिक काळ दुकाने बंद आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार सकाळी अकरा वाजताच थंडावतात, लोकही आता भीतीने फारसे घराबाहेर पडत नाहीत. वैद्यकीय कारणांसाठीच बव्हतांश गर्दी रस्त्यावर दिसत आहे. असे असताना अजूनही शहरी व ग्रामीण भागातील पॉझिटीव्ह येणा-यांची संख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान दोन दिवसात बारामती तालुक्यातील माळेगाव, मोरगाव व सोमेश्वरनगर येथेही स्वॅब तपासणी सुरु करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान ग्रामीण भागातील लोकांची त्यांच्या गावातच तपासणी व्हावी या साठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत माळेगाव बुद्रुक, नीरावागज, मुढाळे येथे तपासण्या झाल्या. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झाल्याचेच यातून स्पष्ट झाले. माळेगामध्ये 175 तपासण्यांमध्ये 66 जण पॉझिटीव्ह आढळले.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय

व्हेंटीलेटर व ऑक्सिजन सुविधेसाठी प्रयत्न- प्रशासनाच्या वतीने व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सुविधा मिळविण्यासाठी आता प्रयत्न सुरु असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. विविध सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्रशासनाला देण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

सगळच बंद करा- अत्यावश्यक सेवांमध्ये औषधांची दुकाने व दवाखाने वगळता इतर सर्वच बाबी बंद करुन कडक लॉकडाऊन करण्याची लोकांचीच मागणी आहे. लॉकडाऊन असले तरी लोकांची रस्त्यावरची वर्दळ कायमच असल्याचे आजही पाहायला मिळाले. त्या मुळे बँका, उद्योगासह सर्वांनाच आठ दिवस तरी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 15 टक्के उपस्थितीचे बंधन बँकांनाही आहे, अनेक ठिकाणी कर्मचारीच कमी असल्याने 15 टक्क्यांचा विचार केल्यास एकच कर्मचारी बँकेत उरतो अशी स्थिती आहे, त्या मुळे सरळ जिल्हाधिका-यांनी औषधे व दवाखाने वगळता इतर बाबी बंद कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा: प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे