ऑनलाइन फूड ऍप्समुळे हॉटेल व्यवसाय घटला !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

पुणे - शहर आणि उपनगरांत 3 हजारांहून जास्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्स आहेत. ऑनलाइन फूड ऍप्सवरून घरी, ऑफिस किंवा महाविद्यालयांमध्ये खाद्यपदार्थ मागविण्याचा कल तरुणांमध्ये वाढत आहे. परिणामी, शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करून नजीकच्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये हवे त्या खाद्यपदार्थाची ऑर्डर देऊन त्याचे ऑनलाइन पेमेंट किंवा रोख रक्कम देण्याचा कल नागरिकांमध्ये वाढत आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर नेमका काय परिणाम झाला या संदर्भात "पुणे हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ""घरी किंवा ऑफिसवर ऑनलाइन फूड मागविण्याचा कल तरुणांसह मध्यमवर्गीयांमध्येदेखील वाढला आहे. विशेषतः नोकरदारांकडून या ऍप्सद्वारे खाद्यपदार्थ मागविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. साहजिकच दहा ते वीस टक्‍क्‍यांनी व्यवसायावर परिणाम झाला. परंतु, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकदेखील "फ्री होम डिलिव्हरी' सुविधा देत असल्यामुळे ते नुकसानदेखील भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीएसटीतील वाढ, हॉटेलला जाण्यासाठी लागणारा वेळ, पार्किंगचा प्रश्‍न या अडचणी टाळण्यासाठी ऑनलाइन फूडचा कल वाढत आहे. परंतु, ग्राहकांच्या बदलत्या कलानुसार हॉटेल व्यावसायिकदेखील सेवेमध्ये सकारात्मक बदल करीत आहेत.'' 

नोकरदार आशिष काळे म्हणाला, ""दुपारचे जेवण किंवा नाश्‍त्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्यास लागणारा वेळ, ऑर्डर दिल्यानंतर ती प्रत्यक्ष टेबलापर्यंत येण्यामध्ये जो वेळ जातो, तो ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍपमुळे वाचतो. ती ऑर्डर रद्द केली तरी काही फरक पडत नाही. परंतु, हॉटेलच्या तुलनेत कमी वेळेत, नाममात्र जादा शुल्क देऊन जागेवर जेवण किंवा नाश्‍ता अवघ्या 25 ते 30 मिनिटांत येतो. त्यामुळे नोकरदारांसह तरुणांमध्ये हा कल आहे.'' 

आयटी क्षेत्रात काम करणारी सुप्रिया पुरंदरे म्हणाली, ""हॉटेलमध्ये जाण्यासाठी ट्रॅफिक, पार्किंग, गर्दी असेल तर वाट पाहत बसण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी जेवण मिळाले तर ते केव्हाही चांगलेच आहे. कमी वेळेत चांगले जेवण किंवा नाश्‍ता मिळत असल्यामुळे पहिले प्राधान्य ऑनलाइन फूडला देते.'' 

पुण्यातील स्थिती 
हॉटेल आणि रेस्टॉरंट ः 3 हजारांहून जास्त 
स्ट्रीट मूविंग फूड स्टॉल ः 5 हजारांपेक्षा जास्त 
ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप ः प्रमुख 10 ते 12 

Web Title: decrease hotel business due to Online food apps