धक्कादायक : कोणतीही पूर्वसूचना न देता डाक सेवकांना सेवेतून केले कमी

post1.jpg
post1.jpg

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योगधंद्यावर परिणाम होत आहे. अशा काळातच टपाल खात्याने कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामीणच्या आठ डाकसेवकांना तातडीने काढून टाकण्यात आले आहे. आठ पैकी दोन कर्मचारी मल्टी-टास्किंग कर्मचारी तर सहा जण ग्रामीण डाकसेवक म्हणून कार्यरत होते. पुणे शहर पूर्व विभागातील पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक मुकुंद एस बडवे यांनी या आठ कर्मचार्‍यांना सेवा संपुष्टात येणार असल्याची निरस्तीकरण पत्रे (टर्मिनेशन लेटर) पाठवले आहे.

नोकरीवरून कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांची भरती सहा वर्षापूर्वी करण्यात आली होती. परंतु पोस्ट खात्याने अचानक काम बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे घरच्यांची उपासमार होत आहे. शिवाय या कोरोनाच्या काळात कामांचा तुटवडा निर्माण झाला आहे, पण कर्मचाऱ्यांचा मागचा पुढचा विचार न करता केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे टपाल खाते कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी मांडले आहे.  लॉकडाऊनच्या कठीण काळात जीवावर बेतून काम केलेले टपाल खात्यातील कर्मचारी या निर्णयाने संतप्त झाले आहेत. 

कमी केलेले आठ कर्मचारी दहावीच्या निकालाच्या आधारे निवडण्यात आले होते. त्यांची नियुक्ती जीडीएस समितीने केली होती. परंतु २०१४-१५ रोजी या कर्मचाऱ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. ते सदोष सिद्ध झाले, शिवाय त्यांची वेतनवाढ थांबवण्यात आली पण त्यांची नोकरी वाचवण्यासाठी या ८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. या उलट त्या अधिकाऱ्याला बढती देण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्हाला कोणतीही कारणे स्पष्ट केली नाहीत, नोटीस दिल्या नाहीत, आमच्यावर कुठलेही आरोप करावे अशी आमची आतापर्यंतची कारकीर्द नव्हती. आम्हाला तातडीने पत्रे देण्यात आली आणि कार्यालयात येण्यास थांबवण्यास सांगितले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच आम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा संतप्ततेचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


या आठ जणांना केले कमी

शुभम ठाकूर, अजित राऊत, गोविंद गोणारे, राजकुमार तेलगे, विवेक लोहकरे, शुभांगी पंडित, सुनील गेंगजे, कपिल नवले


आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या नोकरीच्या आधारे आम्ही घरासाठी लोन घेतले होते, शिवाय काही लोकांकडून उधार घेतले आहे, पण तरीही कोरोनाच्या काळात घरखर्च निघणे अशक्य होत आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे.
- शुभम ठाकूर, नोकरी गमावलेले, ग्रामीण डाकसेवक
 

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे याविषयावर मला बोलता येणार नाही. आम्ही याची उत्तरे न्यायालयात देत आहोत. न्यायालयात याचा योग्य निर्णय होईल.
- मुकुंद बडवे, प्रवर अधीक्षक, पूर्व विभाग पुणे पोस्ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com