व्हॉट्सअॅप स्टेटस ते पुस्तक... एक शायराना प्रवास!

टीम ईसकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

'दीदार' या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे अभिनेता वैभव तत्ववादीने तर या पुस्तकाचं प्रकाशन झालं अभिनेता दिग्दर्शक अलोक राजवाडेच्या हस्ते!

मराठमोळं वातावरण घरात असल्यावर आपोआप मराठीची गोडी निर्माण होणं साहजिक आहे. पण कधी कधी घरातच मराठी भाषेचं साम्राज्य असणं कारण ठरलं आदित्य महाजनच्या हिंदी भाषेतील अनोख्या प्रवासाचं. रोज व्हॉट्सअॅपला असणाऱ्या शायरीच्या स्टेटसचं कधी पुस्तक होईल असं त्यालाही वाटलं नव्हतं... नुकतंच आदित्यच्या 'दीदार' या पुस्तकाचं प्रकाशन अभिनेता अलोक राजवाडे याच्या हस्ते झालं. 

स्वतःच्या लेखनशैलीला धार यावी म्हणून आदित्य महाजनने 2016 मध्ये स्वतःला चॅलेंज देऊन दररोज एक शायरी किंवा हिंदी चारोळी लिहायची असं ठरवलं आणि ती तो न चुकता नित्यनियमाने त्याच्या व्हॉटसअॅप स्टेटसला टाकत असे. असे त्याने सलग 3 वर्षं केलं आणि बघता बघता लोकांनी या त्याच्या शायरीला खूप प्रतिसाद दिला. इतका की, अनेकदा त्याची ही हिंदी चारोळी सोशल मीडियावर वायरल झालेली असायची. 3 वर्षात 1100 पेक्षा जास्ती हिंदी चारोळ्या लिहून त्याने आगळा वेगळा विक्रम तर केलाच पण यातल्याच निवडक 201 चारोळ्या त्याने लोकांच्या आग्रहाखातर पुस्तकाच्या रूपात समोर आणल्या आहेत.

पुस्तकाला प्रस्तावना वैभव तत्त्ववादीची, तर प्रकाशन अलोक राजवाडेच्या हस्ते... 

'दीदार' अर्थात काव्यात्मक भाषेत प्रेमाने बघणे, असे अगदी योग्य नाव त्याने या पुस्तकाला देऊन त्यात प्रेमाचे नवीन काळातील भाव आणि रंग त्यात सादर केले आहेत. या सगळ्या हिंदी चारोळ्यांना जोड आहे मनमोहक चित्रांची जी काढली आहेत अपर्णा निलंगे आणि मिहीर जोगळेकर या तरुण चित्रकारांनी. या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे अभिनेता वैभव तत्ववादीने तर या पुस्तकाचं प्रकाशन झालं अभिनेता दिग्दर्शक अलोक राजवाडेच्या हस्ते. 24बाय7 पब्लिशिंग हाऊस या कलकत्त्यातील प्रकाशन संस्थेने हे पुस्तक काढलं आहे आणि हे पुस्तक भारतभर फ्लिपकार्ट, ऍमेझॉन तसेच ई-बुक स्वरूपात ऍमेझॉन किंडल वर जगभरात उपलब्ध आहे.

"माझं मराठीवर साहजिकच प्रेम आहे. मी पुण्यात वाढलोय शेवटी. मी मराठीतही तितकंच लिहितो आणि माझं पुढचं पुस्तक 2020 मध्ये येणारं मराठीतच असेल. पण मला हिंदी सुद्धा तितकच आवडतं हे पण तेवढच खरं आहे. आपण मराठीचा स्वाभिमान बाळगतो, बाळगायलाच पाहिजे, पण त्या सोबत जर्मन किंवा फ्रेंच भाषांकडे जसे स्पेशलायझेशन म्हणून बघितलं जातं, तसं हिंदी आणि बाकी भाषांकडे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. आज मराठीतील कलाकार हिंदी सिनेमा - चॅनेल्सवर काम करत आहेत, ओम भुतकर - नचिकेत देवस्थळी सारखी मंडळी हिंदी-उर्दू कार्यक्रम घेत आहेत, आपण सर्रास सिनेमे बघताना हिंदीच बघतो, पण त्या भाषेचा अभ्यास किंवा त्यातलं वाचन मात्रं फारच कमी करतो." असं आदित्य महाजन सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deedar book written by Aditya Mahajan published by Alok Rajwade