निवडणुका आल्यानेच आमची बदनामी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पिंपरी - ‘‘आम्ही विकासकामांसाठी ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. कमी दराने निविदा काढल्या; परंतु निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आमची बदनामी केली जाते. शहरासाठी निगडीपासून कात्रजपर्यंत मेट्रो सेवा हवी. मात्र, नियोजित मेट्रो मार्गाचा शहराला फायदा होणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी नाराजी व्यक्त केली. पुढील पाच वर्षांसाठीचे ‘व्हीजन’ डोळ्यांसमोर ठेवून नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. शहरवासीयांच्या विश्‍वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.  

पिंपरी - ‘‘आम्ही विकासकामांसाठी ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. कमी दराने निविदा काढल्या; परंतु निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आमची बदनामी केली जाते. शहरासाठी निगडीपासून कात्रजपर्यंत मेट्रो सेवा हवी. मात्र, नियोजित मेट्रो मार्गाचा शहराला फायदा होणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी नाराजी व्यक्त केली. पुढील पाच वर्षांसाठीचे ‘व्हीजन’ डोळ्यांसमोर ठेवून नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. शहरवासीयांच्या विश्‍वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी विविध विकासकामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटने पवार यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम आदी नगरसेवक आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे आमच्यावर शहरवासीयांनी विश्‍वास टाकला. त्याला पात्र राहून आम्ही नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. कोणालाही त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक आरक्षणे टाकत नाही; परंतु विकासकामे करताना जागेची आवश्‍यकता असते. आम्ही ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. नियोजित रकमेपेक्षा कमी दराने निविदा काढल्या. मात्र, निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. प्रत्येक विकासकामांसाठी करदात्यांचा पैसा योग्यरीतीने खर्च झाला पाहिजे. पारदर्शक पद्धतीने कामकाज झाले पाहिजे. चुकीची कामे होणार नाहीत, याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे.’’ 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांपासून तुम्ही मला साथ दिली. चुकीची उमेदवारी दिल्यावर धडाही दिला; परंतु मला साथ देणारा उमेदवारच तुम्ही निवडून देण्याची काळजी घेतली. परंतु, आता चुकीचा उमेदवार देणार नाही. पालिकेमध्ये अभ्यासू माणसे पाठविण्याचा विचार करतोय.’’

कासारवाडी (प्रभाग क्र.६३) येथील आरक्षण क्र.२२ मधील रस्ते आणि खेळांची मैदाने, मासूळकर कॉलनी येथील (प्रभाग क्र.२८) आरक्षण क्र.८५ येथील नेत्र रुग्णालय,  चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट पुलाखालील (प्रभाग क्र.२५) पार्किंग, उद्यान, विरंगुळा केंद्र आणि विविध खेळांच्या मैदानांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. 

अजित पवार म्हणाले....
कर्करोग रुग्णालय रेटून नेले नाही...
‘‘मासूळकर कॉलनीत कर्करोग रुग्णालय प्रस्तावित होते. त्याला रहिवाशांनी विरोध केला. पोलिस बळाने ते रेटून नेता आले असते. मात्र, तसे केले नाही. त्या ठिकाणी नेत्र रुग्णालयास मंजुरी दिली.’’
तात्या चुकलो... चूक मान्य करतो...
नेत्र रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी पवार हे अनवधानाने मोरेश्‍वर कॉलनी असे बोलून गेले. पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, ‘‘तात्या चुकलो. पण, रेटून नेत नाही. चूक मान्य करतो.’’
जुन्या नोटांसाठी पाचच दिवसांची मुदत दिली असती....
‘‘सरकारने जुन्या नोटांसाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. तेथे मी असतो तर केवळ पाच दिवसांची मुदत दिली असती. जुन्या नोटांसाठी नवनवीन भाव फुटतो आहे. या वेळेत घबाड सापडले असते.’’
चहावाल्यांना चांगले दिवस....
देशात सध्या चहावाल्याला चांगले दिवस आले आहेत. गुजरात येथील चहावाल्याकडे ४०० कोटी रुपये मिळाले. त्याची ६०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे कळते. एखाद्या चहावाल्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? हे बुद्धीला पटतच नाही.’’ 
देशात नोटाबंदीमुळे विपरीत परिस्थिती...
‘‘देशात नोटाबंदीमुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही नवीन पाचशे रुपयांची नोट पाहिली नाही. परंतु, छाप खान्यामधून नवीन नोटांना पाय फुटले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा उद्रेक होता कामा नये.’’
एम्पायर इस्टेट पुलाला मदर तेरेसा यांचे नाव...
एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव दिले जाणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘‘भिकाऱ्यांना भिक देऊ नका. त्याने शहरातील भिकाऱ्यांची संख्या वाढेल. त्याऐवजी भिकाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण आणि धडधाकट माणसांसाठी काम देऊ.’’ 

Web Title: defamation in election