नळजोड देता का नळजोड?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

घरोघरी नळजोड देण्याची मागणी सभेत सातत्याने केली आहे; परंतु घरे अतिक्रमण करून बांधली आहेत. त्यामुळे घरटी नळजोड देता येत नाही. दहा घरांसाठी एक नळजोड देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. मात्र, पाच घरांसाठी एक नळजोड देण्याची मागणी होत आहे. तीन महिन्यांपूर्वी अजून एक नळजोड दिला.
- हाजीमलंग मारीमुत्तू,सदस्य, कॅंटोन्मेंट बोर्ड

देहूरोड - आंबेडकरनगरातील अशोक टॉकीज कंपाउंड परिसरातील सुमारे ७० घरांसाठी अवघे दोन सार्वजनिक नळ आहेत, त्यामुळे सर्वांना पुरेसे पाणी मिळत नाही. प्रत्येक घरात खासगी नळजोड दिल्यास अनामत रक्कम भरू, असे नागरिकांनी स्पष्ट केले.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक तीनमध्ये अशोक टॉकीज कंपाउंड परिसरात सुमारे ७० घरे आहेत. प्रत्येक परिवारातील सदस्य संख्याही मोठी आहे. मात्र, दोनच सार्वजनिक नळजोड आहेत. पहाटे ६.३० ते ११ वाजेपर्यंत पाणी असते. पाणी मिळत नसल्याने भांडणेही होतात. पाणी भरण्यासाठीच अधिक वेळ जातो, असा प्रश्न करीना सय्यद, मुमताज सय्यद, शहाजान शेख, सलमा मुलानी, जमिना सय्यद, अस्लम खान यांनी केला.

अंत बघता का? 
अनेक वर्षांपासून वैयक्तिक नळजोडांची मागणी केली. मात्र, दखल घेतली नाही. ८० ते ९० वर्षांपासून आम्ही येथे राहतो. 
करही भरतो. मग नळजोड देण्यासाठी प्रशासन आमचा अंत का पाहत आहे, असा सवाल महिलांनी केला.

ती घरे सरकारी जागेवर 
सरकारी जागेवर (बी ४ जागा) घरे बांधली आहेत. अशा ठिकाणी खासगी नळजोड देता येत नाही. तसा ठराव सभेत झाला आहे. दहा घरांसाठी नळजोड देण्याबाबत विचारले असता कार्यवाही झाली नसल्याचे स्थापत्य विभागाने सांगितले.

अशोक टॉकीज कंपाउंडचा इतिहास 
ही जागा सप्रेम टाटा यांच्या मालकीची होती. पूर्वी पडद्यावरील खुले सिनेमा थिएटर चालत असे. दरम्यानच्या काळात ते बंद पडले आणि परिसराचे रूपांतर नागरी भागात झाले.

Web Title: dehuroad news water connection