महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांना जंतरमंतर पासून रोखले

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांना जंतरमंतर पासून रोखले
Published on: 

MOD26A03509
दिल्ली ः आंदोलनकर्त्याप्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी स्थानबद्ध करून ठेवले.

दिल्लीच्या बॉर्डरवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अडविले
जंतर-मंतरकडे जाण्यापासून रोखले; काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मोडनिंब, ता. ५ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतरकडे निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या बॉर्डरवरच पोलिसांनी अडविले. सुमारे सहा तास एकाच ठिकाणी थांबविल्यानंतर शेतकऱ्यांनी तेथेच निदर्शने करत घोषणाबाजी केली. काही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना गुंगारा देत जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अशोक नगर व टिळकनगर पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत स्थानबद्ध केले. मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर रात्री उशिरा सर्व पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आले.

या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून जवळपास एक हजार, सांगली जिल्ह्यातून सुमारे दोनशे अन् संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी दिल्लीत पोहोचले होते. आमदार सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, भानुदास सालगुडे पाटील, शेतकरी नेते समाधान फाटे, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, अमोल वेदपाठक, बळीराजा संघटनेचे माऊली जवळेकर आदींचा त्यात सहभाग होता.

दर अन् कोट्याच्या प्रमुख मागण्या
केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव ५० रुपये करावा, इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर द्यावा अन् ऊस उत्पादकांना प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी, साखरेच्या उत्पादनापैकी घरगुती वापरासाठी ३० टक्के अन् व्यापार-उद्योगासाठी ७० टक्के कोटा निश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली. घरगुती वापराच्या साखरेचा दर ५० रुपये, तर उद्योगासाठीच्या साखरेचा दर ७० रुपये करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com