

दिल्ली दंगलप्रकरणातील
याचिका फेटाळल्या
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ : दिल्ली दंगलीशी संबंधित प्रक्षोभक भाषण प्रकरणी विविध नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या विनंती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या.
काँग्रेस नेत्या सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी, आम आदमी पक्षाचे मनीष शिसोदिया, अमानतुल्लाह खान, भाजपचे अनुराग ठाकूर, कपिल शर्मा, प्रवेश वर्मा, अभय वर्मा, एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी, वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती. दिल्लीत २०२०मध्ये दंगल उसळली होती. त्याचवेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचार झाला होता. नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दंगल उसळल्याचे सांगत विविध नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या विनंतीच्या असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या. याचिकाकर्त्यांमध्ये राज्यसभेच्या माजी खासदार वृंदा करात आणि ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेचा समावेश होता. काही याचिकांमध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणाचा दावा करण्यात आला होता, तर दंगलखोरांना विदेशातून फंडिंग प्राप्त झाल्याचे काही याचिकांत म्हटले होते. सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावरील आरोपांची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी केली जावी, दंगलीची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले जावेत, अशा मागण्याही याचिकेत करण्यात आल्या होत्या.
नागरिकता कायद्याला विरोध करत दिल्लीत आंदोलन झाले होते. त्यानंतर दिल्लीत दंगल उसळली होती. त्यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचार झाला होता. त्या अनुषंगाने दाखल असलेल्या याचिका न्या. विवेक चौधरी आणि न्या. मनोज जैन यांनी फेटाळल्या आहेत. जामियामध्ये घुसत पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा नबीला हसन नावाच्या विद्यार्थिनीने केला होता. हसन हिने याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती खंडपीठाने फेटाळली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.