Loksabha 2019 : झेंड्याच्या काठ्यांना मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, दुसरीकडे रस्त्यावरील प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या झेंड्यांसाठी लागणाऱ्या काठ्यांची मागणीही वाढत आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, दुसरीकडे रस्त्यावरील प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या झेंड्यांसाठी लागणाऱ्या काठ्यांची मागणीही वाढत आहे. त्या तयार करणारा बुरूड समाजातील कारागीरही तयारीला लागले आहेत.

महात्मा फुले मंडईजवळ शारदा गणपतीच्या शेजारच्या गल्लीला बुरूड गल्ली म्हणूनच ओळखले जाते. गेली दीडशे वर्षे बांबूपासून वस्तू तयार करणारा हा बुरूड समाज पक्षांच्या झेंड्यांसाठी लागणाऱ्या काठ्या तयार करून विकतो. पक्ष कोणताही असो, झेंडा कोणताही असो, तो लावण्यासाठी काठ्या गरजेच्या असतात. ३० ते ३५ निवडणुकांमध्ये पक्षांच्या प्रचारासाठी त्यांनी तयार केलेल्या काठ्या वापरल्या गेल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडून काठ्या घेऊन जातात. या दरम्यान एक उमेदवार किमान हजार काठ्या विकत घेतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान साधारणतः पाच ते दहा हजार काठ्यांची विक्री होते. त्यासाठी महिनाभर आधीच काठ्या तयार करायला सुरवात होते. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात रस्त्यावर फिरून प्रचार करणे मागे पडले आहे. पण, शक्तिप्रदर्शनासाठी पक्षाचे झेंडे घेऊन फिरण्याची लाट अजूनही कायम आहे. 

सात पिढ्या हा व्यवसाय करणारे जनार्दन मोरे म्हणाले, ‘‘अनेक राजकारणी मंडळी लहानपणी आमच्यासोबत खेळायची. भाजपचे उमेदवार गिरीश बापटही आमच्याबरोबर एकेकाळी तास न्‌ तास गप्पा मारत बसायचे. आता ते लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत, याचा मला आनंद आहे. तसेच, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, तो या गल्लीतूनच काठ्या घेऊन जातो. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारांचे आणि बुरूड समाजाचे समीकरण तयार झाले आहे.’’

तरीही बुरूड समाज उपेक्षितच...
मंडईच्या स्थापनेनंतर बुरूड समाज येथे राहत आहे. सुमारे २२ कुटुंबे येथे राहतात. व्यवसाय वाढला, तशी जागा कमी पडू लागली. २० ते २५ फुटांच्या बांबूपासून वस्तू तयार करण्यासाठी जागाही पुरेशी लागते. वाढत्या शहरीकरणामुळे आता जागेची चणचण भासत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. अनेक राजकारण्यांपुढे प्रश्‍न मांडूनही तो सुटलेला नाही, त्यामुळे काठ्या विकत घेतल्यानंतर आमच्याकडे लक्षच देणार नाही का, असा नाराजीचा सूर लोकांकडून व्यक्‍त होत आहे.

Web Title: Demand for bamboo sticks for political flag