लोकमान्यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या पुतळ्याला राजमान्यतेची प्रतिक्षा... 

जितेंद्र मैड
Thursday, 30 July 2020

लोकमान्य टिळक यांना समोर बसवून तयार केलेला त्यांचा पुर्णाकृती पुतळा कोथरुडमधील महात्मा सोसायटीमध्ये आहे. प्रसिध्द मूर्तीकार केशव बाबूराव लेले यांनी बनवलेला हा पुतळा त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी आहे. या पुतळ्याला संसद भवन किंवा महाराष्ट्र सदन या सारख्या ठिकाणी ठेवावे, अशी लेले कुटुंबियांची अपेक्षा आहे.

कोथरुड (पुणे) : लोकमान्य टिळक यांना समोर बसवून तयार केलेला त्यांचा पुर्णाकृती पुतळा कोथरुडमधील महात्मा सोसायटीमध्ये आहे. प्रसिध्द मूर्तीकार केशव बाबूराव लेले यांनी बनवलेला हा पुतळा त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी आहे. या पुतळ्याला संसद भवन किंवा महाराष्ट्र सदन या सारख्या ठिकाणी ठेवावे, अशी लेले कुटुंबियांची अपेक्षा आहे.

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचणाऱ्या लोकमान्य टिळकांचा हा पूर्णाकृती पुतळा लेले यांनी जुलै 1919 मध्ये घडवला. त्यावेळी टिळक हे सरदार भवनमध्ये वास्तव्याला होते आणि लेले यांचे वय होते अवघे अठरा वर्षे. या घटनेला आज 101 वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोगाने लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षाची 1 ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने घडवलेल्या या पुतळ्याचे डोके व हातपाय हलते राहतील, असे बनवले होते. पुतळ्याचा उर्वरीत भाग नारळाच्या काथ्यापासून तयार केला होता. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फुफ्फुसात प्लॅस्टर ऑफ पॅरिसची धूळ साचून केशव लेले यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पुत्र यशवंत लेले यांनी दादर येथील घरात हा पुतळा ठेवला होता. मुंबईच्या हवामानात या पुतळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून तो डॉ. चित्रा लेले यांच्या महात्मा सोसायटीमधील घरी आणण्यात आला. प्रसिध्द शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांना या पुतळ्याची डागडुजी केली. मध्यंतरी हा पुतळा टिळक स्मारक मंदिर, गीता धर्म मंडळ येथे ठेवण्यात आला होता. परंतु, हा पुतळा जास्तीत जास्त लोकांसमोर राहावा, अशी लेले कुटुंबियांची इच्छा आहे. या संदर्भात त्यांनी विविध राजकीय नेत्यांशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर महाराष्ट्र भवनात हा पुतळा ठेवण्याचे ठरले होते. परंतु, सरकार बदलले व कोरोनामुळे आलेल्या लॉकडाउनमुळे हे काम रेंगाळले. ज्य़ेष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांच्या समाज माध्यमातील पोस्टवरून या विषयावर चर्चा सुरु झाली.

दंगलीत नष्ट झाला अनमोल ठेवा
केशव लेले हे प्रगतशील मूर्तीकार होते. त्याकाळात आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही त्यांनी यांत्रिक हालचाली करणारे पुतळे तयार केले होते. महात्मा गांधींजींवर शस्रक्रिया करत असतानाचे त्यांचे हलते शिल्प खूपच नावाजले होते. ब्रिटीश सरकारने सन 1924च्या वेम्ब्ली (लंडन) येथील ब्रिटीश साम्राज्य प्रदर्शनात व सन 1926 च्या फिलाडेल्फिया (अमेरिका) येथील जागतिक प्रदर्शनात लेले यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली होती. त्यामध्ये लेले यांनी केलेल्या शिल्पांचे प्रदर्शन होते. लेले यांच्या कार्यशाळेत अनेक शिल्पे होती. परंतु, गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत त्यांनी बनविलेली शिल्पे दंगलखोरांनी उध्दवस्त केली. सुदैवाने घरात असलेले टिळकांचे व ज्ञानेश्वरांचे शिल्प मात्र बचावले. 

लोकमान्य टिळक हे राष्ट्रपुरुष होते. माझ्या आजोबांनी खूप मेहनतीने बनवलेली ही कलाकृती प्रेरणादायी आहे. हा पुतळा सतत जनतेसमोर रहावा, अशी आमची इच्छा आहे.
 - डॉ. चित्रा लेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for installation of 100-year-old statue of Lokmanya Tilak in Parliament