अनुवादित पुस्तकांवर उड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

इंग्रजीमध्ये गाजलेल्या पुस्तकांच्या मराठी आवृत्त्यांची मागणी पुन्हा वाढली आहे. ही पुस्तके ८० ते ९०च्या दशकातील असून, त्यावर वाचकांच्या पुन्हा उड्या का पडू लागल्या आहेत, याबाबत प्रकाशकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे.

पुणे - पॅपिलॉन, गॉडफादर, नॉट विदाऊट माय डॉटर, ब्लड लाईन, ७० डेज आदी इंग्रजीमध्ये गाजलेल्या पुस्तकांच्या मराठी आवृत्त्यांची मागणी पुन्हा वाढली आहे. ही पुस्तके ८० ते ९०च्या दशकातील असून, त्यावर वाचकांच्या पुन्हा उड्या का पडू लागल्या आहेत, याबाबत प्रकाशकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे.

या पुस्तकांच्या मराठी आवृत्त्यांकडे आजही वाचक आकर्षित होत असल्याने त्यांच्या आवृत्त्यांची संख्याही वाढत आहे. एखादे इंग्रजी पुस्तक बाजारात आले, तर त्याच्या अनुवादित पुस्तकाचे ॲडव्हान्स बुकिंगही होत आहे. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या आवृत्यांप्रमाणे आता अनुवादित पुस्तकांनाही मागणी वाढली आहे. सध्या अनेक प्रकाशक केवळ अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करत आहेत. 

याबाबत श्रीराम बुक एजन्सीचे संचालक विकास जगताप म्हणाले, ‘‘अनुवादित पुस्तकांचा वाचकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही फक्त अनुवादित पुस्तकेच प्रकाशित करतो. जुन्या पुस्तकांना मागणी का वाढत आहे, हे आश्‍चर्यच आहे. काही ठराविक पुस्तके प्रत्येक वयोगटातील वाचक वाचतात. त्यामुळे संबंधित आवृत्त्यांना वाढत असते.’’ 

काही अनुवादित कथा, कादंबऱ्यांचे विषय दीर्घकालीन चालणारे असतात; तसेच ज्यांना फार वाचनाची आवड नसते, असे लोक खूप वैचारिक आशयांपेक्षा अशा अनुवादित कथांना प्राध्यान्य देतात. त्यामुळे सर्व वयोगटांतून त्याला मागणी आहे.  त्यामुळे आशयसंपन्न पुस्तके चिरकाल टिकणारे आहेत.
-आदित्य गुंड, वाचक

अनुवाद दर्जेदार झाल्यास अनुवादित पुस्तकांना मागणी वाढते. अनेक वाचक काही पुस्तकांचे अनुवाद करण्याचे सूचवतात. अनुवादित पुस्तकांचा वेगळा वाचकवर्ग आहे; पण जुनी पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचली जात आहेत, असेही दिसून येते. 
-रमेश राठिवडेकर, संचालक, अक्षरधारा बुक गॅलरी

Web Title: Demand for Marathi versions of books

टॅग्स