खडकवासल्यातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची आ. भरणे यांची मागणी

राजकुमार थोरात 
बुधवार, 21 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना खडकवासला प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने खडकवासला कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर, दौंड व हवेली तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याची भिती निर्माण झाली असल्याने खडकवासल्याच्या नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामातील आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार भरणे यांनी सांगितले की, २०२१ सालापर्यंत पुणे महानगरपालिकेला ११.५० टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र महानगरपालिका प्रत्यक्षात दरवर्षी १६ ते १७ टीएमसी पाण्याचा वापर करीत आहेत. सध्या महानगरपालिकेने ९१० एमएलडी प्रतिमानसी पाणी देणे गरजेचे असताना महानगरपालिका १६५० ते १७०० एमएलडी प्रतिमानसी पाणी देत असल्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर होत आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

उन्हाळ्यामध्ये पाण्याची दोन आवर्तने मिळावीत यासाठी चालू वर्षी रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याची बचत केली होती. मात्र महानगरपालिका ठरलेल्या काेठ्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करु लागली आहे. जलसंपदा विभागाकडून वारंवार पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करण्याची सुचना दिल्या जात असतात. मात्र महानगरपालिका मनमानी कारभार करुन जलसंपदा विभागाने बंद केलेले पंप परस्पर सुरु करुन पाणी पुरवठा करीत अाहे.

महानगरपालिकेचा अतिरिक्त पाण्याचा वापर शेतकऱ्यांचा मुळावर उठला आहे. खडकवासला प्रकल्पातुन शेतीसाठी पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांची उभी असलेली उस व इतर पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खडकवासला कालव्यावरती अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना ही बंद पडण्याच्या मार्गावरत असून तातडीने पाणी सोडण्याची मागणी  अामदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री गिरीष बापट व जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे. पाणी सोडण्यास विलंब झाल्यास शेतकरी आंदोलन  करण्याच्या तयारीत असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Web Title: demand of mla dattatray bharne for release of water from khadakwasla dam