आधी फास्ट ट्रॅक, मगच फास्ट टॅग

किरण भदे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पुणे- सातारा महामार्गावरील शिवापूर येथील टोल नाका हटवण्यासाठी व 12 वर्षांपासून अर्धवट असलेले रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत "आधी फास्ट ट्रॅक, मगच फास्ट टॅग' अशी घोषणा देत टोलनाका हटाव संघर्ष कृती समिती स्थापना केली आहे.

नसरापूर (पुणे) : पुणे- सातारा महामार्गावरील शिवापूर येथील टोल नाका हटवण्यासाठी व 12 वर्षांपासून अर्धवट असलेले रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत "आधी फास्ट ट्रॅक, मगच फास्ट टॅग' अशी घोषणा देत टोलनाका हटाव संघर्ष कृती समिती स्थापना केली आहे. 

रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग प्राधिकरण, यांना गेली बारा वर्षे महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. त्यांच्याकडून लेखी दिलेली आश्वासनेही पाळली जात नाहीत. अपूर्ण कामामुळे अनेकांचे बळी गेले आहेत; तर अनेकजण कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. वाहतूक कोंडीने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मात्र, टोल वसुली राजरोसपणे चालू आहे. राजकीय पक्षांनी आंदोलने करूनही ढुंकून बघितले जात नाही. सरकार लक्ष घालत नाही. त्यामुळे भोर तालुक्‍यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र येत टोलनाका हटाव संघर्ष कृती समितीची सोमवारी (ता. 2) स्थापना केली. 

या कार्यकर्त्यांनी या संघर्षासाठी हाक देत केळवडे येथील चिंतामणी सभागृहात नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक नागरिक उपस्थित होते. निमंत्रक विलास बोरगे, दिलीप बाठे, डॉ. संजय जगताप यांनी या वेळी भूमिका मांडताना सांगितले की, शिवापूर टोलमुळे या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. हा टोलनाका "पीएमआरडीए'च्या हद्दीबाहेर घालवावा. सारोळा ते कात्रज या दरम्यान गेली 12 वर्ष रेंगाळलेली कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करावी. या रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेला महामार्ग प्राधिकरण प्रशासनास जबाबदार धरावे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. मंजूर भुयारी मार्ग, सेवा रस्ते आणि अन्य सुविधा एकाच वेळी सुरू कराव्या, आदी मागण्या आहेत. त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

जनहित याचिका दाखल करणार 
या प्रकरणी सनदशीर मार्गाने लढा देत जनआंदोलन उभारून जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व नागरिकांनी व प्रवाशांनी या कृती समितीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या समितीमध्ये नागरिकच नेतृत्व करणार असून तालुक्‍यातील सर्व राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष विशेष निमंत्रित म्हणून असणार आहेत. समितीची या पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (ता. 7) सकाळी दहा वाजता केळवडे येथे दुसरी बैठक आयोजित केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to move Shivapur toll on Pune-Satara highway