तयार फराळाला मागणी राजगुरुनगरमध्ये विविध पदार्थांच्या स्टॉल्सवर गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

राजगुरुनगर - दिवाळीनिमित्त शहरामध्ये तयार फराळाच्या पदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेसन व डाळीच्या भावात वाढ झाल्याने पदार्थांच्या भावातही वाढ झाली आहे. दिवाळीची भेट देण्यासाठी मिक्‍स मिठाईला मागणी आहे.

राजगुरुनगर - दिवाळीनिमित्त शहरामध्ये तयार फराळाच्या पदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेसन व डाळीच्या भावात वाढ झाल्याने पदार्थांच्या भावातही वाढ झाली आहे. दिवाळीची भेट देण्यासाठी मिक्‍स मिठाईला मागणी आहे.

नोकरी-व्यवसायामध्ये कुटुंबातील सर्वच मंडळी व्यस्त असल्यामुळे आता घराघरांमध्ये दिवाळीचा फराळ करण्याची पद्धत कमी होऊ लागली आहे. अनारसे, चकलीसारखे काही पदार्थ वगळता इतर पदार्थ विकत घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे अनेक केटरर्सच्या वतीने तयार फराळाचे स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये मोतीचूर लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, शंकरपाळी, शेव, बालुशाही, फरसाण, बदामी हलवा, मोहनथाळ, चिवडा, म्हैसूरपाक यासारखे पदार्थ "ना नफा ना तोटा' या तत्त्वावरही विक्री सुरू आहे, असे राजगुरुनगरमध्ये गेल्या सोळा वर्षांपासून विक्री करणारे सांडूपाटील केटरर्स व भुजबळ केटरर्सच्या चालकांनी सांगितले. बेसन व डाळीच्या भावात वाढ झाली तरी ग्राहकांसाठी पदार्थांच्या भावात फक्त 10 टक्के वाढ केली असल्याचे रवींद्र भुजबळ यांनी सांगितले. करंजी व चकली 200 रुपये किलो असून, इतर गोड पदार्थ 150 रुपये किलो, तर शेवचिवडा व फरसाण 180 रुपये किलोने विकले जात आहेत.

दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी मिठाई दुकानांमध्ये मिक्‍स मिठाई व ड्रायफ्रुट्‌सच्या बॉक्‍सनाही चांगली मागणी आहे. याशिवाय विविध कंपन्यांच्या चॉकलेट्‌सचे बॉक्‍स भेटवस्तू म्हणून दिले जात आहेत. त्यामुळे मिठाईची दुकानेही ग्राहकांनी गजबजली आहेत.

Web Title: Demand for readymade diwali food