पुणेकरांना ‘ताप’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरात डेंगी आणि चिकुनगुन्या या कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. डासांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या या तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुणे - पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरात डेंगी आणि चिकुनगुन्या या कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. डासांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या या तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढली असल्याने डेंगी आणि चिकुनगुन्याची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. यातील काही रुग्णांची डेंगी आणि चिकुनगुन्याची वैद्यकीय चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने प्रभावी औषधे द्यावी लागत आहेत. शहरात जानेवारीपासून १७ ऑगस्टपर्यंत २०७ जणांना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे. चिकुनगुन्याच्या रुग्णांचा आकडा १२१ पर्यंत वाढल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. जूनपासून डेंगी आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. डेंगीचे सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल नगर रस्ता, येरवडा आणि कसबा येथे डेंगीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

दोन लाखांवर दंडवसुली
पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न केल्याने डासांच्या पैदाशीला कारणीभूत ठरलेल्या सोसायट्या, कार्यालये, अशा वेगवेगळ्या दीड हजार आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ४६ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क (दंडवसुली) करण्यात आली आहे.

पुढील दीड महिना पुरेल इतका औषधांचा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे. त्याशिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक या प्रमाणात ‘व्हेईकल माउंटन फॉगिंग मशिन’ घेतल्या आहेत. पुढील चार दिवसांमध्ये या मशिन उपलब्ध होतील. 
- डॉ. संजय वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

ताप, थंडी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाढले आहे. चार ते पाच दिवस हा ताप कायम राहतो. यात लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे दिसून येते. विश्रांती, भरपूर पाणी पिणे आणि योग्य औषधोपचार आवश्‍यक आहेत. 
- डॉ. सचिन तांबे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue diseases increased in the pune city