अजितदादांकडून कोरोनाच्या लढाईसाठी महत्त्वाच्या सूचना 

मिलिंद संगई 
Sunday, 26 April 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

बारामती (पुणे) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर आज अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी शरद भोजन थाळी, नागरिकांचे ऍपद्वारे सर्वेक्षण, स्वस्त धान्य वाटप, कोरोना तपासणी प्रयोगशाळा यासह विविध कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

या वेळी अजित पवार म्हणाले, ""शरद भोजन थाळीबाबत व्यवस्थित सर्वेक्षण करून अधिकाधिक लोकांना याचा लाभ कसा मिळेल, याची काळजी घ्या. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेसाठी राज्य सरकारने 1125 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देऊ केले आहे, त्याचे वाटप संबंधितांपर्यंत व्यवस्थितपणे होईल, याबाबतची महसूल विभागाने काळजी घ्यावी. स्वस्त धान्य सर्वांना पोहोचले पाहिजे, यासाठी आवश्‍यक ती काळजी घ्यावी.'' 

नक्की कोणत्या भाषेत सांगितल्यावर यांना समजेल

""कोरोना तपासणी प्रयोगशाळा वेगाने उभी करण्यासाठी डॉ. तांबे यांनी पाठपुरावा करावा. घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण या पुढील काळात ऍपद्वारे करण्याबाबत गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी नियोजन करावे. कोल्हापूर व पुणे येथे असे सर्वेक्षण सुरू असून, त्या धर्तीवरच बारामतीतील सर्वेक्षण व्हावे. टंचाईच्या संदर्भात तालुक्‍यातील परिस्थितीवर लक्ष ठेवावे. लोकांना पिण्याच्या पाण्यासह इतर कोणतीही अडचण होऊ नये, याबाबत पंचायत समितीस्तरावर काम व्हावे,'' अशी सूचना त्यांनी केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या बैठकीला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, गटनेते सचिन सातव, नगरसेवक किरण गुजर, संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the situation regarding Corona in Baramati