नारायणगावच्या 'केव्हीके'तर्फे माती परीक्षणाची सोय करा; उपमुख्यमंत्र्यांच्या झेडपीला सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

बारामती येथील केव्हीकेमुळे बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, मुळशी, दौंड, वेल्हे आणि हवेली या आठ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आपापल्या शेताच्या मातीचे आरोग्य तपासून घेता येणार आहे.

पुणे : जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना आपापल्या शेतीतील मातीचे आरोग्य तपासण्याची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली पाहिजे. ज्याप्रमाणे बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने (केव्हीके) जिल्हा परिषदेने ऍग्रो अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आणखी एक ऍग्रो अँब्युलन्स सुरू करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेला केली आहे.

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई​

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील शेतीतील माती परीक्षणासाठी आता फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऍग्रो अँब्युलन्स बांधा-बांधावर फिरून माती नमुने घेणार आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हे परीक्षण केले जाणार आहे. या ऍग्रो अँब्युलन्सचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर आदी उपस्थित होते.

२३ बियर बार चालकांवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई; 'सोशल डिस्टन्सिंग'चे नियम बसवले धाब्यावर​

बारामती येथील केव्हीकेमुळे बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, मुळशी, दौंड, वेल्हे आणि हवेली या आठ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आपापल्या शेताच्या मातीचे आरोग्य तपासून घेता येणार आहे. याच धर्तीवर नारायणगावच्या केव्हीकेतर्फे ही सुविधा उपलब्ध केल्यास, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि मावळ या पाच तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल, असे मत पवार
यांनी यावेळी व्यक्त केले.

पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय; ऑफलाइन परीक्षा केंद्रांवर नसणार 'स्क्वॉड'!​

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने गावनिहाय जमीन आरोग्य अभियान
राबविण्यात येत आहे. तसेच या फिरती माती, पाणी, पान देठ परीक्षण
प्रयोगशाळेद्वारे गावातील शेतकऱ्यांचे जमिनीचे माती नमुने, विहीर, बोअर, नदी यातील पाणी नमुने व फळबागा, भाजीपाला पिकांचे पान आणि देठ नमुने
जागेवरच परीक्षण करून घेता येणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि योग्य शिफारस त्वरित मिळाल्यामुळे पिकाची होणारी संभाव्य हानी टाळता येऊ शकणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सांगितले.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar instructed Pune Zilla Parishad to facilitate soil testing by KVK center Narayangaon