मुलीच्या प्रवेशासाठी पुण्यात आलेल्या देऊळगावकरांचे पैसे चोरीला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने रिक्षात बसलेल्या देऊळगावकर यांच्या पत्नीच्या हातातील पर्सला जोरात हिसका देऊन ती ओढून घेतली व ते करिष्मा सोसायटीच्या बाजूला फरार झाले.

पुणे : लातूरहून मुलीच्या अॅडमिशनसाठी पुण्यात आलेले लेखक अतुल देऊळगावकर व त्यांच्या पत्नीच्या हातातून पर्स हिसकावून फीसाठी आणलेले 15,000 रूपये चोरट्यांनी काल (ता. 24) लंपास केले. डेक्कनपासून रिक्षात बसलेले हे दाम्पत्य कर्वे रस्त्याने कोथरूडच्या दिशेने जात असता दशभूजा गणपती मंदिराच्या पुढे हा प्रकार घडला.  

दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने रिक्षात बसलेल्या देऊळगावकर यांच्या पत्नीच्या हातातील पर्सला जोरात हिसका देऊन ती ओढून घेतली व ते करिष्मा सोसायटीच्या बाजूला फरार झाले. देऊळगावकर यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, पण चोरटे वेगात असल्याने ते कुठल्या बाजूस गेले ते कळाले नाही. पर्समध्ये रोख रक्कम, मोबाईल व इतर गोष्टी होत्या. या घटनेनंतर देऊळगावकर यांनी त्वरीत पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी केलेल्या शोधानंतर, पर्स व मोबाईल नटराज सोसायटीजवळ मिळाला आहे, पण अद्याप चोरांचा शोध लागला नसून पोलिसांचे शोधकार्य चालू असल्याचे, देऊळगावकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

Web Title: deulgaonkar couple s purse snatched by thief in pune