लोकसहभागातून विकासकामांवर भर देणार - शैलजा मोरे

लोकसहभागातून विकासकामांवर भर देणार -  शैलजा मोरे

भाजपचा ‘वचननामा’ प्रभावीपणे आणि तितक्‍याच पारदर्शकपणे राबविणे हाच माझा यापुढील मुख्य ‘अजेंडा’ राहील. ‘डिजिटायझेशन’ तसेच लोकसहभागातून तो राबविण्यासाठी प्रसंगी आग्रही राहील. अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’च्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी सर्वसोयीसुविधांयुक्त ‘सार्वजनिक व्यायामशाळा’, ज्येष्ठांसाठी ‘विरंगुळा केंद्र’ आणि झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी सुसज्ज ‘आरोग्य केंद्र’ विकसित करण्यावर माझा भर राहील, अशी भूमिका शहराच्या नियोजित उपमहापौर शैलजा मोरे यांनी बोलून दाखविली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपासून मध्यमवर्गीय महिलांचे संघटीकरण, सक्षमीकरण... ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण... बचत गटांचे व्यवस्थापन... विदर्भ सहयोग मंडळ, सावरकर मंडळ आणि अनुष्काच्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क ही पिंपरी- चिंचवड शहराच्या नवनिर्वाचित उपमहापौर शैलजा अविनाश मोरे यांची ओळख नव्हे, तर प्राधिकरण प्रभाग क्रमांक पंधरामधून भरघोस मतांनी झालेला विजय आणि पाठोपाठ भाजपच्या पहिल्या उपमहापौरपदी झालेली नियुक्ती हीच त्यांच्या कामाची पोचपावती. 

अर्थात, लोककल्याणार्थ केलेल्या समाजकारणामुळेच त्या अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोचल्या. पती अविनाश मोरे आणि मुलगा अनुप यांच्या समाजकारण आणि राजकीय कारकिर्दीची जोड त्याला होतीच.

समाजकारण करत असताना पती आणि मुलाच्या हातात हात घालून त्यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला. जनसंघापासून शहरातील भाजपचे कार्यकर्ते म्हणून अविनाश मोरे यांचा लौकिक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढल्याने राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे बीज पतीकडूनच शैलजाताईंमध्ये रुजले गेले. केवळ रुजलेच नाही, तर ते घट्ट रोवलेही. त्यामुळेच समाजकारणाबरोबरच त्यांची राजकीय व्याप्तीही उत्तरोत्तर वाढत गेली. त्यामुळेच शहराच्या उपमहापौरपदी विराजमान होण्यापर्यंतचा प्रवास यशस्वी होऊ शकला. 

अत्यंत नेटका संसार करणाऱ्या शैलजाताई उपमहापौरपदाचा भार तितक्‍याच नेटाने आणि सहजतेने वाहतील, असा विश्‍वास त्यांच्या पतींना वाटतो. 

मूळच्या ग्वाल्हेरमधील असलेल्या शैलजाताईंना माहेरच्या ४० सदस्यीय कुटुंबाकडून नेतृत्वाचे बाळकडू मिळाले.  अविनाश मोरे यांच्याबरोबर १९८१ मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. सुरवातीला चिंचवडमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्या प्राधिकरणामध्ये स्थिरावल्या. तेथेही मोरे यांनी सुरवातीला जनसंघ आणि नंतर भाजपची बांधणीचे काम हाती घेतले. महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या गीता आफळे यांना त्यांनी सहा मतांनी निवडून दिले. त्यानंतरही त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून मोठे समाजकार्य हाती घेतले. पतीचे राजकारण व समाजकारण जवळून बारकाईने न्याहाळत असताना त्या सामाजिक कार्यात कधी ओढल्या गेल्या, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. घरकाम करणाऱ्या महिलांपासून त्यांनी त्याची सुरवात केली. कधी भिशीच्या माध्यमातून, तर कधी कर्ज काढून देत त्यांनी अनेक महिलांच्या आर्थिक, कौटुंबिक समस्या सोडविल्या. कालानुरूप त्याचा आवाका वाढला. शेकडो महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या. पाठोपाठ ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. नव्हे, तर त्यांनाही संघटित करून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला.

दरम्यान, मुलगा अनुप यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारण व समाजकार्याची कास धरली. या दोन्ही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. 

मुले मोठी होऊन सांसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्याने शैलजाताई समाजकारणात अधिकच सक्रिय झाल्या. त्याला पती व मुलांचाही पाठिंबा मिळाला. त्यातून त्यांनी २००८ मध्ये निवडणूक लढविली. त्यामध्ये निसटत्या मतांची त्यांचा पराभव झाला. या पराभवातून सकारात्मक दृष्टिकोन घेत त्यांनी आपल्या कामावर अधिक भर दिला. अर्थात, त्याची गोड फळे त्यांना यंदाच्या निवडणुकीत चाखता आली. 

शहराची उपमहापौर होण्याचा मान मिळेल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे हा अनपेक्षित आनंद मोठाच आहे. परंतु त्याबरोबरीने जबाबदारी वाढल्याचीही मला जाणीव झाली आहे, असे त्या सांगतात. 
उपमहापौर या नात्याने पक्षाचा अजेंडा राबविताना स्वत:चा अजेंडा राबविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नव्हे, तर पक्षाने जनतेला दिलेल्या पारदर्शक व्यवहाराच्या वचनाशी बांधिल राहण्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. लोकसहभागातून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, जनसामान्यावर पक्षाची एक वेगळी छाप सोडण्याचा त्यांचा मानस आहे. पती, मुलगा अनुप व समीर यांच्यासह तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली शहरहितासाठी कार्यक्रम राबविण्यासाठी त्या उत्सुक आहेत. 
 

उपमहापौरांचा अजेंडा
अमरावतीमधील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाप्रमाणे शहरातही असे केंद्र विकसित करण्याचा मनोदय.
प्रत्येक विभागामध्ये ज्येष्ठांसाठी सोयीसुविधांयुक्त विरंगुळा केंद्रांचा विकास
शहरातील प्रत्येक झोपडपट्टीच्या ठिकाणी वैद्यकीय सोयीसुविधांयुक्त आरोग्य केंद्र
वर्दळीच्या ठिकाणी तसेच वसाहतींमध्ये स्वच्छतागृह
डिजिटायझेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या संपूर्ण विकसित शहर बनविणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com