esakal | देवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बँटींग; म्हणाले पवार साहेबांना...
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बँटींग; म्हणाले पवार साहेबांना...

प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचं, आपलं जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही, अशी जोरदार टीकाही फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बँटींग; म्हणाले पवार साहेबांना...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची ग्वाही दिली आहे, केंद्र सरकार तर मदत करणारच आहे. दरवेळेसच केंद्र सरकार मदत करते, पण राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकून टाकता कामा नये. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, राज्याने ती पार पाडत तातडीची मदत शेतक-यांना द्यायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात मदतीचा चेंडू टोलविला आहे. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचं, आपलं जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही, अशी जोरदार टीकाही फडणवीस यांनी केली. राज्याला राज्याची जबाबदारी घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

आज त्यांनी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला, त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता तातडीची मदत द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

फडणवीस म्हणाले, ''मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्या काळात पावसाने झालेल्या नुकसानीनंतर दहा हजार कोटींचे पॅकेज मी स्वताः राज्याच्या वतीने जाहीर केले होते. त्या वेळेसही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या वतीने मदत सुरु करीत असल्याचे त्या वेळेस नमूद केले होते.'' या पूर्वीही जेव्हा आपत्ती येते तेव्हा केंद्राचे पथक येते, नुकसानीचा गोषवारा केंद्राला पाठवावा लागतो, त्या नंतरच ती मदत मिळते, गुरांना चारा देखील पुरविला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. 

आमच्या काळात अतिवृष्टीनंतर पाच दिवसात आम्ही पंचनामे पुर्ण केले, जेथे पंचनामे होऊ शकले नाहीत, तेथे मोबाईलवर फोटो काढून टाकला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला होता, आता तर शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ व्यवस्था व्हायला हवी असे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांच्यावरही टीका
पवारसाहेब हे कृषीमंत्री होते, त्यांना केंद्राकडून मदत कशी मिळते हे माहिती आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो, गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसून त्या नुसार मदतीची भूमिका निश्चित करतात. हे त्यांना माहिती असतानाही प्रत्येक गोष्ट केंद्रावर टोलवायची आहे. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारवर अवलंबून राहायचे आहे, मी निश्चित सांगतो केंद्र सरकार निश्चित मदत करणार आहे. सोयीस्कर राजकीय भूमिका कोणत्याच नेत्यांनी  घेऊ नये, असेही ते म्हणाले. 

पिकविम्याचे धोरण जे राज्याने बदलले आहे, त्यामुळे केळीच्या पिकाला मदत मिळणार नाही. आमच्या काळात जे निकष होते, तेच ठेवले पाहिजेत. आता निकष बदलायचे असतील तर या पुढील काळासाठी ते बदलावे लागतील, असेही ते म्हणाले. ...ही वेळ नाही..

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यपालांसोबत तुमचे जे काही मतभेद आहेत ते प्रदर्शित करण्याची ही वेळ नाही. आता शेतक-यांना मदतीची खरी गरज आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे, असे फडणवीस म्हणाले. सरकारचा नाकर्तेपणा समोर येतो आहे. असंतोष तयार झाला आहे, अस असतानाही शरद पवार यांना सरकारच्या बाजूनेच भूमिका घ्यावी लागणार आहे. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर अनेक पालकमंत्री आपापल्या मतदारसंघात गेले, असा आरोपही त्यांनी केला. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)