'फडणवीस यांना कोरेगाव भीमा हिंसाचाराची पूर्वकल्पना होती'

'फडणवीस यांना कोरेगाव भीमा हिंसाचाराची पूर्वकल्पना होती'

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे दोन वर्षांपूर्वी
झालेल्या दंगलीची पूर्वकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होती. एवढेच नव्हे या दंगलीला फडणवीस यांचीच फूस होती. त्यामुळे या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर फडणवीस यांना बोलवा आणि त्यांची चौकशी करा, अशी मागणी बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मंगळवारी (ता.31) पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

या दंगलीला तत्कालीन राज्य सरकारच जबाबदार आहे. या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे सर्व पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत. हे पुरावे उच्च न्यायालयात आणि चौकशी आयोगासमोरही सादर
केले आहेत. तरीसुद्धा फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना मात्र भिडे आणि एकबोटे यांना क्‍लिनचीट दिल्याचा आरोपही मेश्राम यांनी यावेळी केला.

याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी कुमार काळे, विठ्ठल सातव, सचिन बनसोडे, किशोर तुपारे, ऍड. राहुल मखरे, रेखा कापसे आदी उपस्थित होते.

मेश्राम म्हणाले, "उद्या (ता.1 जानेवारी) कोरेगाव भीमा येथे राज्यस्तरीय अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात कोरेगाव भीमा दंगलीत आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात आंदोलकांच्या
बाजूने लढणाऱ्या वकिलांचा सत्कार केला जाणार आहे. शिवाय नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत चर्चा करून, याला विरोध करण्याबाबतची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. या कायद्याला भारत मुक्ती मोर्चाचा विरोध आहे. याच्या
निषेधार्थ येत्या 29 जानेवारीला बंद आंदोलन केले जाणार आहे.''

कांबळे, बडोलेच्या मंत्रिपदावर संक्रांत

या दंगलीबाबत तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आंदोलकांच्या बाजूने होते. त्यांची ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांना मान्य नव्हती. त्यामुळेच फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांना कालांतराने त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकले. बडोले, कांबळे हे दोघेही कोरेगाव भीमा दंगलीचे बळी ठरले असल्याचा आरोपही
वामन मेश्राम यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com