संत परंपरेने मराठी भाषा समृद्ध - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - ‘‘महाराष्ट्र धर्म, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा समृद्ध होण्याचे श्रेय संत परंपरेला द्यावे लागेल. संत विचारांनी सामान्य माणसाला प्रेरित करून त्याच्या जीवनात परिवर्तन घडविले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाला अनुरूप आणि कालसापेक्ष पद्धतीने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोचविणे आवश्‍यक आहे,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

श्री गंधर्व वेद प्रकाशनातर्फे ‘संत दर्शन चरित्र ग्रंथा’च्या १३ खंडांच्या संचाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमात श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, प्रवचनकार चैतन्य महाराज देगलूरकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संत तुकाराम महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले, दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा पगडा असल्याचे दिसून येते. समाजाचा विचार करतो, तो सामाजिक नेता असतो. परंतु केवळ समाजाचेच नव्हे, तर अखिल विश्‍वाच्या कल्याणाचा विचार करणे, ही परंपरा संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी सुरू केली. 

तर अध्यात्म आणि भौतिक जीवनाची सांगड घालत जगायला संत तुकाराम महाराज यांनी शिकविले.

आजवर झालेल्या आक्रमणांनंतरही संत विचारांमुळेच आजही आपली संस्कृती, भाषा जिवंत राहिली आहे.’’

‘संत विचार आणि दैनंदिन जीवन’ या विषयावर देगलूरकर यांचे प्रवचन झाले, तर डॉ. मोरे यांनी ग्रंथाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अभय टिळक यांनी केले.

संतांचे विचार राज्यात पोचविणार
संत परंपरेचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी, तसेच अनुदानित ग्रंथालयांमध्ये संतांचे विचार आणि परंपरा सांगणारे साहित्य पोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Web Title: devendra fadnavis talking