मंचर रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात भाविकाचा बळी

डी. के. वळसे पाटील 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याने चव्हाण यांचा बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. वाहतूक कोंडी प्रमाणेच रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी - शितोळेनगर पुणे) हे जखमी झाले आहेत.

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याने चव्हाण यांचा बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. वाहतूक कोंडी प्रमाणेच रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी साडेदहा वाजता अपघात झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर सोडून चालक फरार झाला. 

पुणे येथून अमोल डुकरे व विठ्ठल चव्हाण मोटारसायकल (एम एच १४ जि पी ८३२१) वरून भीमाशंकरकडे जात होते. मंचर जवळ असलेल्या हॉटेल मनोरंजन समोर पुणे नाशिक रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यापूर्वी येथे दुचाकीस्वरांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. डुकरे मोटरसायकल चालवत होते. खड्डे चुकविण्यासाठी डांबरीरस्ता सोडून साईड पट्ट्यावर मोटरसायकल डुकरे यांनी उतरविली.

पुन्हा डांबरी रस्त्यावर दुचाकी चढवून रस्त्यावरून मंचरच्या दिशेला जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकची (एक एच १७ बी डी ९०५१) मोटरसायकलला धडक बसली. अमोल डुकरे जखमी झाले. त्यांच्या पाठीमागे बसलेले विठ्ठल चव्हाण यांच्या तोंडावर ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावरच ट्रक सोडून चालक पळून गेला. परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक मदतीसाठी धावून आले. त्यांनी अमोल डुकरे व विठ्ठल चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डुकरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. चव्हाण हे पाटण (जि. सातारा) येथील कोयना शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम करत होते. अपघाताची फिर्याद चव्हाण यांचा चुलत भाऊ गंगाराम चव्हाण यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस हवालदार संजय गिलबिले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पळून लेलेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. 

दरम्यान गेल्या वर्षी मनोरंजन हॉटेल जवळ नंदकुमार पेट्रोलपंपासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार रईस शेख (रा. पिंपळगाव-खडकी ता. आंबेगाव) या तरुणाचा जाग्यावर मृत्यू झाला होता. आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातील एक महिला अधिकारी व एक उद्योजिका (दोघी रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) यांच्याही दुचाकीचे दोन वेगळे अपघात मनोरंजन हॉटेल जवळ होऊन त्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे दुचाकी चालकांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा धसका घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The devotee died at manchar road