भारतात लशीची चाचणी पुन्हा सुरु करण्यास DGCI ची परवानगी - सीरम इन्स्टिट्यूट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

कोरोनावरील लस तयार कऱण्यात आघाडीवर असेलल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु कऱण्यात आली आहे.

पुणे - जगात कोरोनाचा कहर असताना अनेक देश यावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनावरील लशीची चाचणी सुरु आहे. यातील 8 लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस तयार कऱण्यात आघाडीवर असेलल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु कऱण्यात आली आहे. त्यानंतर भारतातील भागीदार कंपनी असलेल्या सीरमलासुद्धा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लशीची चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच चाचणी पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. 

ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या 'कोविशिल्ड' या लशीची चाचणी थांबवण्यात आल्यानंतर भारतातही मानवी चाचण्या थांबवण्याच्या सूचना डीजीसीआयने दिल्या होत्या. जागतिक स्तरावरील स्थगित झालेल्या चाचण्या आणि औषध नियंत्रकांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने सांगण्यात आले होते.

ऑक्सफर्डच्या साथीने ऍस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार असलेल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात चालू आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकावर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. फक्त इंग्लंडच नव्हे तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्येही चाचण्यांना स्थगिती दिली होती. 

हे वाचा - आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरू

अग्रेसर 'कोविशिल्ड' : 
- ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली ही लस जगात सर्वात अग्रेसर लस आहे. जगभरात ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या माध्यमातून मानवी चाचण्या घेण्यात येत आहे. 
- देशातील मानवी चाचण्या सहउत्पादक कंपनी असलेली सिरम इन्स्टिट्यूट घेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुण्यासह देशभरातील 100 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली आहे. हा दुसरा टप्पा सुरक्षितपणे पार पडला आहे. आता अंतिम टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dgci give permission to serum institute restart the trials in India