कोरोनाची दुसरी लाट रोखणे आपल्याच हाती 

crowd-pune
crowd-pune

गेल्या काही दशकांत सर्वच क्षेत्रांत पुण्याची भरभराट झाली. मात्र, कोरोनाने (coronavirus) याला खीळ बसली. गेल्या ५० वर्षांत प्रथमच पुण्यात इतकी मोठी जीवित वा वित्तहानी झाली असेल. अवघ्या आठ महिन्यांत आठ हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हजारोंचा रोजगार हिरावला गेला असून, उद्योगधंद्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सात हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या पुणे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या साऱ्याचा दूरगामी परिणाम पुण्याच्या चौफेर विकासावर होणार आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट पुण्याला परवडणार नाही. ती रोखणे आपल्याच हाती आहे. 

दिवाळीचा (Diwali) सण मोठा, नाही आनंदाला तोटा...ही उक्ती वैयक्तिक पातळीवर सर्व जण सध्या अनुभवत आहेत. सुदैवाने पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बाजारपेठेत, सर्वसामान्यांमध्ये दिवाळीचा उत्साह जाणवतोय. यावर्षी दिवाळी हा पहिलाच असा सण आहे- जो बऱ्यापैकी उत्साहात साजरा करता येत आहे. त्यावर जरूर कोरोनाचे सावट आहे; पण पाडवा, गणेशोत्सव, नवरात्राच्या तुलनेत ते बऱ्याच प्रमाणात कमी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली होती. अजूनही रस्त्यांवर दररोज तुडुंब गर्दी होत आहे. यामुळे शहराच्या अर्थचक्राला गती मिळण्यास नक्कीच मदत झाली यात शंका नाही; पण दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘डिस्टन्सिंग’ आहे कुठे? 
याला कारणेही तशीच आहेत. कोणी मान्य करो अथवा न करो मात्र या काळात सर्वत्र ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पुरता फज्जा उडाला. कोणत्याही रस्त्यावर नजर टाकल्यास हे विदारक सत्य प्रत्येकाला जाणवले असेल. कोरोनाकाळात लहान मुले, वृद्ध नागरिकांनी शक्‍यतो घराबाहेर पडू नये हे जगभर मान्य झालेले सूत्र. मात्र, याचा सर्रास विसर पडल्याचे जाणवते. खरेदीच्या निमित्ताने सर्व वयोगटातील नागरिक घराबाहेर पडले. तसेच कामासाठी बाहेर पडलेल्यांची संख्याही वाढल्याने शहरातील रस्त्यांवर पूर्वीसारखीच ‘ट्रॅफिक जॅम’ची स्थिती उद्‍भवत आहे. मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी राज्यात पोलिसांनी सर्वाधिक दंड पुण्यातच वसूल केला. हे नक्कीच भूषणावह नाही. खरे तर मास्कच्या किमती आता सर्वांच्या आवाक्‍यात आल्या आहेत; पण प्रश्‍न आहे तो मानसिकतेचा. ती जोवर बदलत नाही तोपर्यंत या परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे नाहीत. हिवाळ्यामुळे व्यायाम करणाऱ्यांची सोय व्हावी यासाठी महापालिकेने उद्याने सुरू केली; पण तेथेही नियमांचे पालन होत नसल्याने ती बंद करण्याबाबत आता विचार सुरू झाला आहे. या सर्व बाबींमुळेच आरोग्य यंत्रणांच्या मनात पुन्हा धडकी भरली असल्यास नवल नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण काय करू शकतो? 
- आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका 
- बाहेर पडताना कटाक्षाने मास्क वापरा 
- हातांची; नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची स्वच्छता करा 
- सोशल डिस्टन्सिंगचे सतत भान ठेवा 
- कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्या

दिल्लीसारखी स्थिती नको 
युरोपातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. तेथे सध्या रोज सात ते आठ हजार रुग्ण सापडत आहेत. वाढती थंडी, प्रदूषित हवा यामुळे दिल्लीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. पुण्याचे वातावरणही कमी अधिक प्रमाणात दिल्लीसारखेच आहे. शहरात वर्दळ वाढल्याने प्रदूषित हवेचे प्रमाण वाढू लागल्याचे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) स्पष्ट केले आहे. शहरात तापमानाचा पारा घसरू लागला आहे. थंडीची चाहूल एव्हाना लागलीच आहे. या काळात दमा, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढतेच. अशांना कोरोना होण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे. कोरोना हा श्‍वसनाची संबंधित आजार असल्याने थंडीचा काळ त्यासाठी पोषक ठरू नये यासाठी आता प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. 

गेल्या आठवड्यापासून पुण्यात दररोज रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाने अजूनही पाठ सोडलेली नाही. नोव्हेंबरच्या शेवटी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा आरोग्य यंत्रणांचा होरा आहे. रोज दोन हजार रुग्ण होतील हे गृहीत धरून महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे सर्वांनाच आता पुन्हा सतर्क व्हावे लागेल. प्रदूषणामुळे आपल्या श्वसनसंस्थेची, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. कोरोना श्‍वसनाची संबंधित आजार आहे. त्याचा सामना करायचा तर फुफ्फुसे दणकट हवीत. म्हणूनच ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी केली पाहिजे. काम; तसेच व्यवसायाच्या निमित्ताने ज्यांचा संपर्क अधिक असतो, अशांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार वेगाने होतो. दुसरी लाट येण्यामध्येही अशा ‘सुपर स्प्रेडर व्यक्ती’ कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे लहान मोठे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे; तसेच ज्येष्ठांनी दिवाळीनंतर पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. अशांनी आपली लक्षणे अंगावर काढता कामा नयेत. सौम्य लक्षणे असतानाच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. दिवाळीनंतर प्रत्येकानेच यासाठी वैयक्तिक स्तरावर पावले उचलल्यास ही लाट रोखणे अशक्‍य नाही. कोरोनाला आता वेळीच पिटाळून लावण्याची गरज आहे. आतापर्यंत व्हायची ती हानी झाली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी कोरोनाची दुसरी लाट थोपविणे अत्यावश्‍यक आहे आणि हे सर्वस्वी तुमच्या आमच्या हाती आहे. वैयक्तिक व सामूहिक प्रयत्नांतूनच ती रोखता येणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com