Crime News : गुन्हेगार जोमात पोलिस कोमात! वाढत्या गुन्हेगारीमुळे धायरी परिसरात जनजीवन भयभीत

सिंहगड रोड पोलिसांचा गुन्हेगारांनवरील दबदबा कमी.
Crime
Crimesakal

धायरी - वडगाव, नऱ्हे, धायरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरी, घरफोड्या, वाहन चोऱ्या यांचे प्रमाण वाढले असून, खून किंवा खुनी हल्ला अशा घटनांमुळे जनजीवन भयभीत झाले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचा दबदबा गुन्हेगारांवर वचक नसल्याने गुन्हेगारी उंबरठ्यावर असलेली अल्पवयीन मुले शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत असल्याचे भीषण चित्र आहे.

जागेच्या वादातून धारदार शस्त्राने वार केल्यामुळे तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना धायरी येथील रायकर मळा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय १९, रा. खंडोबाचा माळ, रायकर मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य पोकळे व संपत काळोखे नातेवाइक असून, त्यांच्यात जागेवरून वाद होता.

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत राजू पोकळे याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.‌ तथापि, आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे धायरी परिसरात अजूनही तणाव आहे.

चारच महिन्यांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी केलेल्या गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. ही घटना भर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (वय १९, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

धायरी येथील काळा खडक, धायरेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गायरान येथे गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा घालणे भीतीपोटी छेडछाड होणाऱ्या महिला तक्रार देण्यास धजवत नाही. तसेच बहुतांशी गुन्हेगार हे सतरा वर्षाच्या आतील असून ते निर्ढावत चालले असून परिसरात गुन्हेगारी वृत्तीवर वचक राहिला नाही. याच परिसरात गुन्ह्यात वापरण्यात येणारे हत्यारे लपवली जातात असे स्थनिकांची चर्चा.

नऱ्हे गावातील अभिनव परिसरात तुळजाभवानी मंदिरालगतच्या अनुज विहार, मातृ छाया व इतर सोसायटीत दहा फ्लॅट फोडून दरोडेखोरांनी दागिने आणि रोकड लंपास केली. गेल्या ऑक्टोबर मध्ये रविवारी पहाटे दोन ते अडीच दरम्यान ही घरफोडी झाली.

तीन सोसायटीतील बंद असलेल्या दहा फ्लॅट मध्ये चोरी झाल्याने रहिवासी हादरले. ज्या फ्लॅट मध्ये लोक राहत होते, त्यांच्या दाराच्या कड्या बाहेरून लावून बंद फ्लॅटचे कडीकोयंडे चोरट्यांनी कटावणीने उचकटले. कपाटातील दागिने, रोकड एवढेच नाही तर मोबाईल चार्जर, इलेक्ट्रिक शेगडी अशा वस्तू सुध्दा चोरुन नेल्या.

पोलिसांनी दत्तक घेतल्याच्या थाटात वडगाव, नऱ्हे,धायरी परिसरात सराईत गुंड आणि गुन्हेगार वावरत असून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. काही गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांना पुढे करून गुन्हे घडवित असल्याचे भीषण चित्र आहे.

गुन्हेगारांना अद्दल घडवण्यापेक्षा त्यांच्याकडे पैसे किंवा महागड्या वस्तूंची मागणी करणाऱ्या काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गुंडांचे फावले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

दांडेकर पूल, दत्तवाडी,जनता वसाहत अशा परिसरातून स्थलांतरित झालेले तरुण गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळत असून एकेकाळी शांत असलेल्या या परिसरात राहणे अवघड झाले असल्याची तक्रार होताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com