धायरीत टॅंकरला बसविणार ‘जीपीएस’

Tanker-GPS
Tanker-GPS

पुणे - धायरीतील रहिवाशांसाठी नवी पाणी भरणा केंद्र (टॅंकर पॉइंट) सुरू करतानाच पाणी भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक टॅंकरवर महापालिकेची नजर राहणार आहे. यासाठी टॅंकरला ‘जीपीएस’ यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. लोकांच्या नावाखाली पाणी घेऊन ते अन्य ठिकाणी विशेषत: व्यावसायिक ठिकाणी पोचविणाऱ्या टॅंकरचालक-मालकांविरोधात कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे आणि वेळेत पाणी मिळणार आहे. 

कालव्यातून पाण्याच्या चोरी करून ते अधिक भावाने विकले जात असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले. त्यानंतर रहिवाशांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा, यासाठी पाठपुरावाही केला. दरम्यान, खासगी टॅंकरचालक आणि मालकांनी धायरीतील रहिवाशांना पाणीपुरवठा बंद केल्यानंतर महापालिकेने या भागात आणखी दोन नवे ‘टॅंकर पॉइंट’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काम हाती घेण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल आणि लोकांना पाणी पुरविण्यास सुरवात होईल. मात्र पाणीटंचाई आणि लोकांची गरज लक्षात घेऊन, टॅंकर नेमके कुठे जातात, याकडेही महापालिका लक्ष देणार आहे. 

जुन्या आणि नव्या अशा चार ‘टॅंकर पॉइंट’च्या माध्यमातून रोज टॅंकरच्या दोनशे फेऱ्या होणार आहेत. पहिल्या टप्प्यात येथील लोकांसाठी एवढा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येथील सोसायट्यांसह व्यायसायिक विशेषत: हॉटेल, कारखाने आणि अन्य प्रकारच्या छोट्या-मोठ्या उद्योगांकडूनही पाण्याची वाढती मागणी आहे.

व्यावसायिक पाण्यासाठी जादा पैसे मोजत असल्याने टॅंकरचालक आणि मालकांचेही त्यांना प्राधान्य असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, ‘टॅंकर पॉइंट’वर येणाऱ्या टॅंकरच्या नोंदी ठेवतानाच त्यांची पाहणी करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com