रेशनची साखर लाल फितीत

जागृती कुलकर्णी
शुक्रवार, 30 मार्च 2018

सामान्य माणसाच्या हक्काची ही साखर असून, ती केवळ सरकारी लाल फितीत अडकून आहे. २०१६ पासूनची ही साखर शिवाजीनगर येथील शासकीय गोदामात पडून न ठेवता ती गरजवंतांपर्यंत पोचविण्यात यावी.
- काशिनाथ शिंदे, सदस्य दक्षता समिती, अन्न व नागरी पुरवठा विभाग.

धायरी - एकीकडे स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना साखर नाही म्हणून फलक बघावा लागत आहे, तर दुसरीकडे शासकीय गोदामात सुमारे ४०० क्विंटल साखर पडून आहे. या साखरेची किंमत सुमारे दहा लाख आहे. 

जानेवारी २०१६ मध्ये शासनाने खरेदी केलेली साखर अद्याप गोदामात पडून आहे. त्यात आणखी साठा येत आहे. ही साखर या गोदामातून हलविण्यात यावी, याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही.  

शहरालगतचा ग्रामीण भाग हवेली पुरवठा विभागाकडे होता; मात्र पुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्राची विधानसभा मतदारसंघनिहाय पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे हवेली पुरवठा विभागातील बरीचशी सर्व स्वस्त धान्ये दुकाने पुणे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली; मात्र ही दुकाने वर्ग करताना या दुकानांच्या नावे असलेली साखर संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली नाही. परिणामी लाल फितीच्या कारभारामुळे ही साखर गोदामातच पडून राहिली. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यावर कार्यवाही केली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला गोदामातील सारखर नेण्यात यावी, असे सांगणारा अहवालही उपजिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येतो. तसेच त्याची एक प्रत गोदाम विभागासदेखील देण्यात येते; परंतु असे असूनदेखील अद्यापही साखर वर्ग केली गेली नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही साखर पडून आहे. 

अधिकारी अनभिज्ञ
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी आर. बी. पोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ माहिती घेतो, बघतो, अशी आश्‍वासने दिली. 

Web Title: dhayri pune news ration sugar