पिंपरी शहरात घुमू लागला ढोल-ताशांचा दणदणाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

एकूण ढोल पथके - १००
पथकांकडील ढोलची संख्या - ४०००
पथकांकडील ताशांची संख्या-  १००० ते १२००
टोलची संख्या - ४० ते ५०
पथकांकडील ध्वजांची संख्या - १०० ते १५०

पिंपरी - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.

सायंकाळी घराबाहेर पडल्यास शहराच्या कोपऱ्यावर, वळणावर एखाद्या चौकालगत ढोल-ताशाचे पथक सराव करताना दिसतात. या पथकांच्या नावांचे फलकही लावले असून, पथकात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. पथकात अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ४० ते ५५ वयोगटापुढील सर्वांचा सहभाग असून तरुणींचा टक्काही वाढत असल्याचे चित्र आहे. या पथकांमध्ये शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक असे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती आहेत.

चिंचवड येथील एका ग्रुपचे प्रमुख तुषार दिघे म्हणाले, ‘‘आमच्या ग्रुपकडून गणेशोत्सवातून ढोल वाजविण्याच्या उत्पन्नातून मिळालेल्या रकमेतून बचत करून समाजोपयोगी उपक्रम राबवितो. गतवर्षी अशाप्रकारे दहा हजार रुपयांची बचत करून आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी दिली. ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कोणालाही बिदागी देत नाही.’’

चिंचवड येथील पथकात काम करणारी पूजा बत्तलवार म्हणाली, ‘‘ढोल-ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे. या कलेची जोपासना करणे आवश्‍यक वाटत असल्याने मी एका ग्रुपमध्ये सहभागी झाले.’’

गेल्या तीन वर्षांपासून मी एका ग्रुपमध्ये ताशा वाजविण्याचे काम करतो. त्यामुळे करमणुकीसह मानसिक ताण कमी होतो.   
- साईनाथ फाळके, आयटी कर्मचारी, चिंचवड

गेल्या पाच वर्षांत ढोल-ताशांच्या पथकांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे काहीजण व्यावसायिक तर काहीजण आवड म्हणून पाहतात.  
- तुषार दिघे,  ढोल, ताशा पथक प्रमुख, चिंचवड

Web Title: Dhol-tasha sound start in PCMC