कर्करोग दिन विशेष : रक्त तपासणीतून कर्करोगाचे निदान

Blood-Testing
Blood-Testing

पुणे - ‘लिक्विड बायोप्सी’ ही कर्करोगाच्या अचूक निदानाची नवीन दिशा आहे. रुग्णावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता फक्त पाच मिली रक्ताच्या तपासणीतून कर्करोगाचे निदान आता शक्‍य झाले आहे. या संशोधनात मराठी शास्त्रज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञांचे मोलाचे योगदान आहे. याबाबतचा शोधनिबंध ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’ (आयजेसी) या विश्‍वविख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

कर्करोगाच्या निदानासाठी आतापर्यंत शस्त्रक्रिया करून संबंधित अवयवाचा छोटासा तुकडा (बायोप्सी) विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविला जात असे. त्यात कर्करोगाच्या पेशी सापडल्यानंतर त्या आधारावर पुढील उपचाराची दिशा निश्‍चित होत. मात्र आता फक्त रक्त तपासणीतून कर्करोगाचे निदान शक्‍य झाले आहे. नाशिक येथील ‘दातार कॅन्सर जेनेटिक्‍स’मध्ये हा प्रयोग केला. 

पुण्यातील कर्करोग तज्ज्ञ आणि इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक आँकोलॉजी माजी अध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे या प्रयोगात सहभागी झाले होते. ते म्हणाले, ‘‘हे संशोधन एकाच वेळी भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत सुरू होते. यात ४४ हजारांहून अधिक कर्करोगाचे रुग्ण आणि सामान्य निरोगी माणसांच्या रक्तनमुन्यांचे विश्‍लेषण करण्यात आले. कर्करोगाचे निदान केवळ एका रक्त नमुन्याच्या चाचणीतून (लिक्विड बायोप्सी) करण्याची पद्धत यातून विकसित झाली.’’

कर्करोगाचे उपचार म्हणजे ‘बायोप्सी’ ही संकल्पना भविष्यात कमी होईल. त्यामुळे कर्करोगाच्या निदानासाठी रुग्णांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागणार नाही. रक्ताच्या तपासण्यांमधूनच अचूक निदान होईल. 
- डॉ. अनंतभूषण रानडे, माजी अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक आँकोलॉजी

एका दशकापूर्वी कर्करोग बरा होण्याची शक्‍यता कमी असायची. पण आता प्रत्येक रुग्णासाठी ‘पर्सनलाइजड ट्रिटमेंट’ करता येते. कोणत्या कर्करोगावर कोणते औषध रामबाण ठरेल, हे नेमकेपणे सांगणे हा कर्करोगाच्या उपचारावरील नवीन दृष्टिकोन आहे.
-  डॉ. अमित भट्ट, कर्करोगतज्ज्ञ

रक्‍ताच्या कर्करोगाशी सखूबाईंची झुंज
सखूबाई म्हणजे लहानपणीची सगळ्यांची लाडाची सखू. ती मूळची झापवाडीतील (जि. नगर) शेतकरी कुटुंबातली. लहानपणापासून वक्तशीर, आत्मविश्वासू असणारी सखू अभ्यासातही हुशार. मस्ती करणे, मित्र-मैत्रिणींमध्ये खेळणे हीच तिची दिनचर्या. ती चौदा वर्षांची असताना शाळेतील सहलीला गेल्याचे निमित्त झाले आणि ताप आला. पाठोपाठ पोटदुखी वाढली. प्लेटलेट्‌सची संख्या अचानक खूप कमी झाली. तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान पुण्यातील केईएम रुग्णालयात झाले.

शेतकरी कुटुंबातल्या सखूच्या घरची परिस्थिती बेताचीच. उपचारासाठी लागणारे आर्थिक पाठबळही त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवकांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळविली. तिच्यावर उपचार सुरू झाले. सखूच्या सकारात्मक मानसिकतेमुळे तिच्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.

अभ्यास, खेळ सांभाळून ती उपचार घेत होती. उपचार करताना होणाऱ्या त्रासाचा बाऊ सखूने कधी केला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून तिने दहावीत ८० टक्के गुण मिळविले. तिने रुग्णसेवेचे क्षेत्र निवडले. केईएममध्येच सखूने नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला. ती सलग दोन वर्षे परीक्षेत पहिली आली. परंतु, पुन्हा २०१८ मध्ये तिला त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू करावे लागले. अजूनही तिच्या उपचाराबरोबरच तिचे शिक्षणही सुरू आहे. अद्यापही ती कर्करोगाशी लढत आहे. 

या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग दिनाची संकल्पना ‘मी आहे’ आणि ‘मी होईन’ अशी आहे. सखू कर्करोगाशी झुंजत आहे. त्याच वेळी तिने तिचे ध्येय निश्‍चित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com