कवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी

manjari.
manjari.

मांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांबरोबरच कवडीपाट येथील पानवठ्यावर वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी दिसू लागली आहे. हे पक्षी वैभव टिपण्यासाठी हौशी पक्षी निरिक्षकांसह शहर व परिसरातील नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

कवडीपाट येथे मुळा-मुठा नदीचे विस्तिर्ण पात्र आहे. येथे असलेल्या बंधाऱ्यामुळे हे पात्र पाण्याने काठोकाठ भरलेले असते. त्यामध्ये छोटी बेटेही आहेत. त्यामुळे "सुभग, नदी सुरय, शेकाट्या, खंड्या, कोतवाल, वेडा राघू, वारकरी, नकट्या (स्पूनबील), मुग्धबलाक, मोर बगळा, पिवळा धोबी, छोटा पाणकावळा, काळा शराटी, चमकदार शराटी, ब्राम्हणी बदक,कंठेडी चिखल्या, कवडा धिवर, ठिपकेदार नाचरा,निलांग, फूलटोचा, सिंजीर, हळद्या, चष्मेवाला, स्वर्गिय नर्तक, मराठा सुतार, तांबट, पाणभिंगरी,  ब्राम्हणी मैना,  दयाळ, खाटीक, टिटवी, युवराज, मोर यांसारख्या स्थानिक पक्षांचा वावर येथे कायम पाहवयास मिळतो. हौशी पक्षीनिरीक्षकांना गेली अनेक वर्षांपासून हे ठिकाण खुणावत आहे. गेली काही वर्षांपासून हे ठिकाण प्रसिध्दीस आले असून परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात पक्षी निरिक्षणाचा आनंद घेण्यासाठी येथे येत आहेत. त्यांच्यासाठी हे ठिकाण जणू पर्वणीच ठरले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर पासून सहा किलोमीटर अंतरावर कवडीपाट पक्षी निरीक्षण केंद्र आहे. देशाच्या उत्तरेकडील प्रांतासह परदेशातून येणारे चक्रांग, चिमनपानलाव्हा, थापट्या, ठिपकेवाला तुतारी आदी हिवाळी स्थलांतरीत पक्षांचे दर्शनही येथे होते. विविध जातीचे पक्षी सध्या येथील पानवठा व त्या भोवतालच्या जंगलात विसावू लागले आहेत. शहरासह राज्यातील अनेक हौशी पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक येथे येत असल्यामुळे मुळा-मुठा नदीच्या परिसरातील हे ठिकाण गेली अनेक वर्षापासून पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून ओळखले जात आहे. 

सुर्योदयापूर्वी सुमारे दीड-दोन तास येथे जणू पक्षी संमेलनच भरलेले पाहवायास मिळते. या पक्षांच्या मनमोहक हालचाली, एेटदार चाल, त्यांचा किलबिलाट, कूजन, वेगवेगळ्या रंगांच्या पंखांची फडफड, पाण्यावरील सूर आणि आकाशातील भरारी अशा वेगवेगळ्या गोष्टी येथे अनुभवता येतात. मुळा-मुठा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या विस्तीर्ण जलाशयात यातील अनेक पक्षी मनसोक्त पहुडताना दिसतात. जलाशयावर तरंगणारे वाफेचे लोट आणि त्यातून पाण्यावर झिरपणारी कोवळी किरणे याचा वेगळा आनंद येथे घेता येतो. तसेच सुर्योदयाचे पाण्यात पडलेले लालेलाल प्रतिबिंबही मनमोहकच असते. थव्याने पाण्यावर तरंगणारे ब्राम्हणी बदक,मराल, चक्रांग, फ्लवर, थापाट्या, डूबकी मारून शिकार करणारे नदी सुरय, खंड्या तर उथळ पाण्यात आपले लांबसडक पाय रोऊन उभा असलेला शेकाट्या आणि पाणवठ्याच्या कडेला उभे राहून शिकार करणारे बगळे या सर्वांच्या एकाचवेळी होत असलेल्या हालचाली भान हरखून टाकतात. 

""हौशी पक्षी निरीक्षक, अभ्यासक, वेगवेगळे पक्षी पाहण्यासाठी येणारे बालचमू यांच्यासाठी हे जवळचे ठिकाण आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येतो. शहर व परिसरातून हौशी तरूणांसह अनेक पक्षीमित्र व अभ्यासक येथे वारंवार हजेरी लावत असतात. मी स्वतः दरवर्षी येथे पक्षीनिरीक्षणासाठी येत असतो. प्रत्येकवेळी नवीन अनुभव येथे येतो.''
विशाल तोरडे, पक्षी अभ्यासक

""वारंवार बदलणारे वातावरण, पाणी प्रदूषण आणि नागरिकांचा राबता यामुळे पक्षांचे हे आश्रयस्थान असुरक्षीत झाले आहे. शहरातील पाषाण, बंडगार्डन, धायरी, खडकवासला, पाचगाव पर्वती व मुळा-मुठा नदिच्या परिसरात पक्षी निरीक्षणाला चांगला वाव आहे. मात्र, नदी पात्रात साचणारे प्लॅस्टीक, धागे, कचऱ्यातून येणाऱ्या इंजेक्शनच्या सूया व बेसुमार वृक्षतोड तसेच शिकाऱ्यांकडून पक्षांना मोठा धोका निर्माण झाला आहे.'' 
रोहीत पोमन, हौशी पक्षी निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com