ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी ; शाखानिहाय महाविद्यालयांची माहिती पुस्तिकेत नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

""गेल्यावर्षी शाखानिहाय महाविद्यालयांची यादी आणि संबंधित महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेची सविस्तर यादी माहिती पुस्तिकेत दिली होती. यंदा ही यादी माहिती पुस्तिकेत उपलब्ध नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही,'' अशी तक्रार काही पालकांनी केली आहे. 

पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाइन अर्ज भरताना काही ठिकाणी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय निवडताना व प्राधान्यक्रम ठरविताना अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा माहिती पुस्तिकेत शाखानिहाय महाविद्यालयांची माहिती दिली नाही. त्यामुळे पुरेशी माहिती नसल्याने अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. 

शिक्षण संचालनालयातर्फे अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची माहिती देणारी पुस्तिका विद्यार्थ्यांना दिली जाते. यंदाही शाळांमार्फत या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच, शाळांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसमवेत पालकही महाविद्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी हजेरी लावत आहे. संबंधित वर्गशिक्षिका किंवा मदतनिसांच्या साहाय्याने हे अर्ज भरले जात आहेत. प्राधान्यक्रम ठरविताना महाविद्यालयांची पुरेशी यादी पाहता येत नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. नूतन मराठी विद्यालयात (मुलांची) अर्ज भरण्यासाठी कॉम्प्युटर लॅब खुली केली आहे. यामध्ये अर्ज भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. 

""गेल्यावर्षी शाखानिहाय महाविद्यालयांची यादी आणि संबंधित महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेची सविस्तर यादी माहिती पुस्तिकेत दिली होती. यंदा ही यादी माहिती पुस्तिकेत उपलब्ध नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही,'' अशी तक्रार काही पालकांनी केली आहे. 

सर्व शाखांच्या सर्व महाविद्यालयांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, त्याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरताना महाविद्यालयांची यादी उपलब्ध होणार नाही, असे होणे शक्‍य नाही. तरीही संबंधित विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अर्ज भरावा. तसेच, महाविद्यालये आणि त्यातील प्रवेश क्षमतेची सविस्तर माहिती पुस्तिकेत उपलब्ध नसली, तरीही अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. 
 

- मीनाक्षी राऊत, सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती 

Web Title: Difficulties in filling out an online application