...अन्‌ सोबत चहा घेण्याची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - एका प्रकरणात तुरुंगाचे नियम बाजूला ठेवून माणुसकीला साथ दिल्याने आपणास "न्यायाधीशांसोबत चहा पिण्याची शिक्षा' मिळाली होती, अशी आठवण कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिराने आयोजित कार्यक्रमात सांगितली.

पुणे - एका प्रकरणात तुरुंगाचे नियम बाजूला ठेवून माणुसकीला साथ दिल्याने आपणास "न्यायाधीशांसोबत चहा पिण्याची शिक्षा' मिळाली होती, अशी आठवण कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिराने आयोजित कार्यक्रमात सांगितली.

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात साठे यांची डॉ. अनघा लवळेकर यांनी मुलाखत घेतली. नागपूर, मुंबई येथील कारागृहात काम करीत असताना आलेले अनुभव साठे यांनी श्रोत्यांना सांगितले. एक हृदयस्पर्शी आठवण सांगताना त्या म्हणाल्या, ""एकदा रात्रीच्या सुमारास महिलांच्या वार्डमधून कोणी तरी मोठ्याने रडत असल्याचा आवाज आला. मी कामावरच होते. माझी उत्सुकता चाळली. तिला भेटण्याचा मनोदय मी व्यक्त केला असता, कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला. ती चांगली नाही, तिला भेटून तुम्ही काय करणार, असा कर्मचाऱ्यांचा सूर होता. मात्र तो आवाज ऐकून मला राहावले नाही. मी तिची भेट घेतली असता, दोन लहान मुले घरी आहेत; नवरा हयात नाही. त्यांची काळजी कोण घेणार, या चिंतेने ती रडत होती. मी तिला धीर दिला. पोलिस छाप्यामध्ये एक महिला सापडली होती. ती शरीरविक्रयाच्या व्यवसायात असल्याचा पोलिसांना संशय होता. म्हणून तिला आमच्या कारागृहात रवाना करण्यात आले होते.''

""ती खरे बोलते का, हे तपासण्यासाठी तिला गाडीत घालून तिच्या घरी नेण्याचा विचार मनात आला. मात्र कारागृहाच्या नियमानुसार तसे करता येत नव्हते. अखेरीस माणुसकी मोठी समजून मी तिला तिच्या घरी घेऊन गेले. त्या वेळी तिची दोन मुले घरासमोर बसून आईची वाट पाहात होती. त्यांना घेऊन मी कारागृहात आले. दुसऱ्या दिवशी ही घटना मी न्यायालयासमोर कथन केली आणि मी नियम मोडल्याने आपण द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, असे सांगितल्यानंतर न्यायाधीशांनीही माणुसकी दाखवत सोबत चहा घेण्याची शिक्षा मला दिली. तो प्रसंग अविस्मरणीय आहे,'' असे साठे म्हणाल्या.

Web Title: DIG Swati Sathe