रेशीम दिनानिमित्त सोलापुरात डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ

रेशीम दिनानिमित्त सोलापुरात डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ
Published on

सोलापुरात डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ

३२ साप्ताहिक सत्रांतून रेशीम उत्पादकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन; आधुनिक तंत्रज्ञानासह बाजारपेठेचे ज्ञान मिळणार

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ०२
रेशीम दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती देण्यासाठी डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा रेशीम कार्यालय, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष–एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ व बाळे यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत यावेळी २४ रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम कोष खरेदीदारांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात रेशीम उत्पादनापासून थेट बाजारपेठेपर्यंतची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर सध्या रेशीम उत्पादन करणारे शेतकरी तसेच रेशीम शेतीत नव्याने सहभागी होऊ इच्छिणारे युवा व होतकरू शेतकरी यांना कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे.

या कार्यशाळेत एकूण ३२ साप्ताहिक सत्रे घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शुक्रवारी एक सत्र होणार असून, तुती रोपलागवड व व्यवस्थापन, तुती बागेची निगा, रेशीम किड्यांचे संगोपन, रोग व कीड व्यवस्थापन, कोष उत्पादन, गुणवत्तावाढ, काढणीपश्चात प्रक्रिया तसेच रेशीम कोषाची बाजारपेठ, विक्री व विपणन व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार, एपीएमसी हिरजचे विनोद पाटील, प्रकल्प समन्वयक रोहित अदमाने आणि कृषी पर्यटन तज्ज्ञ अविनाश एखंडे उपस्थित होते.

उत्पादनासोबत उत्पन्न वाढविण्यावर भर
“शेतकऱ्यांना रेशीम शेतीतील शास्त्रीय तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि बाजारपेठेची माहिती मिळावी, तसेच उत्पादनाची गुणवत्ता व उत्पन्न वाढावे, या उद्देशाने डिजिटल रेशीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या ३२ साप्ताहिक सत्रांचा रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.” .
- विनीत पवार, जिल्हा रेशीम अधिकारी.

------------

Marathi News Esakal
www.esakal.com