... आणि मी ‘डिजिटल व्यवहार साक्षर’ झालो!

नंदकुमार सुतार
सोमवार, 17 एप्रिल 2017

लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या मुलीला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘डिजिटल व्यवहारां’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कोट्यवधी नागरिक ‘कॅशलेस व्यवहारां’कडे आकर्षित होतील, असा आशादायी सूर निघतो आहे. ते कधी तरी नक्कीच घडेल; परंतु केंद्राच्याच दुसऱ्या एका योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक ‘डिजिटल’कडे वळू लागले आहेत.

पुणे - ‘हातात ना पैसे, ना धनादेश; तरी व्यवहार करता, कसे वाटते?’ ‘आधी जरा शंका होतीच; पण आता आत्मविश्‍वास आलायं. तसे हे सोयीचेच आहे’, एका ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ही प्रतिक्रिया. आधी खूपच साशंक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता मोबाईलवरील आर्थिक व्यवहारांबद्दलची उत्सुकता वाढू लागली आहे. या वयात कोठेही न जाता घरबसल्या पैशांचे व्यवहार करता आले, तर... हे बहुतेकांचे स्वप्न असते. ते साकार होऊ लागले आहे.

लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या मुलीला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘डिजिटल व्यवहारां’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कोट्यवधी नागरिक ‘कॅशलेस व्यवहारां’कडे आकर्षित होतील, असा आशादायी सूर निघतो आहे. ते कधी तरी नक्कीच घडेल; परंतु केंद्राच्याच दुसऱ्या एका योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक ‘डिजिटल’कडे वळू लागले आहेत. पुण्यात त्यासाठी ‘कॅशलेस व्यवहार शिबिरे’ही सुरू झाली आहेत. अशाच एका शिबिरात ‘साक्षर’ झालेले ८५ वर्षीय वैजनाथ पेंडसे यांच्या तोंडून याबद्दल ऐकले तेव्हा ‘कॅशलेस’ची गोडी ज्येष्ठांनाही लागली आहे आणि हे लोण किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज आला.

केंद्राच्या ताज्या बक्षिसांवर नजर टाकली, तर ते जिंकणारे सर्व जण तरुण आहेत, असे लक्षात येते. मग ते ग्राहक श्रेणीतील असोत किंवा व्यापार श्रेणीतील. मुले किंवा तरुणांसाठी मोबाईल फोन केव्हाच ‘जीवनावश्‍यक वस्तू’ बनली आहे; मात्र याच मोबाईल फोनचा जुन्या पिढीला तिटकारा. पाऊणशे वयोमान ओलांडलेल्यांना तर संवादासाठीही मोबाईल हातात घेण्याचा कंटाळा. त्यांना ‘मोबाईल साक्षर’ करणे म्हणजे मोठेच काम; पण ज्येष्ठांसाठी केंद्राने सुरू केलेल्या योजनेचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. यासाठी काही संस्था काम करत आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या अशाच एका शिबिरात पेंडसे मोबाईल व्यवहार शिकले आहेत. 

‘‘पाऊणशे वयोमान गाठल्यानंतर मोबाईलबद्दल कसले आकर्षण राहणार, उलट तो अडचणीचाच वाटतो; परंतु तुमचे आर्थिक व्यवहार या फोनवरून होऊ शकतात, असे ज्येष्ठ नागरिकांना पटवून दिल्यानंतर त्यांची मोबाईल फोनवरील व्यवहारांबद्दलची उत्सुकता वाढते,’’ हा ‘जनसेवा’चे डॉ. विनोद शहा यांचा अनुभव आहे. 

बिबवेवाडी येथे झालेल्या शिबिरात पेंडसे ‘मोबाईल व्यवहार साक्षर’ झाले. ते नोकरीतून निवृत्त होऊन दोन तपांचा कालावधी लोटला. स्वत:च्याच पैशांचे व्यवहार करण्यासाठी नेहमी बॅंकेत जाणे कष्टाचे होते. त्यात वयाची भर पडते तसे ते अधिक त्रासदायक होते. ते म्हणतात, ‘‘सुरवातीला मी खूप साशंक होतो. आपले पैसे नको त्या बॅंक खात्यावर तर जाणार नाहीत ना, संबंधिताला पैसे किती वेळात मिळतील, नक्की मिळतील ना... नाना शंका; पण आता ही भीती गेली आहे. शंका दूर झाल्या आहेत आणि मी कॅशलेस व्यवहार साक्षर झालो आहे. सरावानंतर कॅशलेस व्यवहार खूप सोपे वाटायला लागलेत आणि ते घरबसल्या सहज होतात. वयोवृद्ध मंडळी व्यवहारांच्या सत्यतेबाबत साशंक असल्याने मोबाईल साक्षर व्हायला आढेवेढे घेतात; पण आता सर्वांनीच कॅशलेस व्यवहारांचे तंत्र शिकून घ्यायला काहीच हरकत नाही. उलट त्यामुळे जीवनमान अधिक सुकर आणि गतिमान होत आहे; मात्र एक विनंती आहे, दर दोन महिन्यांनी आमच्यासारख्या लोकांचे फेरप्रशिक्षण व्हायला हवे. सगळंच लक्षात नाही हो राहात या वयात !’’

पेंडसेकाकांसारखे हजारे वयोवृद्ध डिजिटल व्यवहारांकडे वळत आहेत. एकट्या ‘जनसेवा’च्या शिबिरांचा सुमारे ९०० ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. अनेक संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात काम करत आहेत. महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेच्या प्रसारासाठी पुण्याच्या शर्मिला ओसवाल यांचा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला. ज्येष्ठांच्या क्षेत्रात काम करताना असे लक्षात येते, की त्यांचा वयोगट ६५ पासून ८५ वर्षांपर्यंत आहे. मोबाईलवर व्यवहार करणारे राऊतकाका हे तर ८९ वर्षांचे आहेत. या वयातही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची या सर्वांची वृत्ती ‘कॅशलेस’ला मोठे बळ देणारी आहे. 

Web Title: Digital transactions