Dilip_Walse_Patil
Dilip_Walse_Patil

पुणे जिल्हा परिषदेने खाजगी हॉस्पिटलशी करार करावा; वळसे-पाटील यांनी का केली मागणी?

मंचर (पुणे) : आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाय योजनांची तातडीने अंबलबजावणी करावी. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपचाराची सुविधा सरकारी रुग्नालयाप्रमाणे खासगी रुग्णालयातही मोफत मिळाली पाहिजे. त्यासाठी खाजगी रूग्णालयाबरोबर पुणे जिल्हा परिषदेने तातडीने सामंजस्य करार करून रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू करावे.

आरोग्य यंत्रणेतील त्रुटी सोडविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी एकत्र बसून आरोग्य यंत्रणेतील त्रुटींचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. रविवारी (ता.२६) वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक झाली.

वळसे पाटील म्हणाले, ''मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, महाळुंगे पडवळ, पेठ, रांजणगाव आदी मोठ्या गावांत कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव हा गंभीर विषय आहे. बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक यांचे तातडीने विलगिकरण करावे. तेथे स्वच्छता, डॉक्टर, औषधे, दर्जेदार जेवण, नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मलठण येथील कोविड केअर सेंटर ३ दिवसांत सुरू होणार आहे. तसेच पाबळ येथेही कोविड केअर सेंटर सुरू करावे.

मंचर, घोडेगाव आणि अन्य मोठ्या गावात सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि लहान व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. ही बाब शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी निदर्शनास आणून दिली. या संदर्भात वळसे पाटील म्हणाले, सदर गावांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्याबरोबर चर्चा करून ताबडतोब मार्ग काढावा. फक्त आढावा बैठका घेतल्या जातात, पण कृती होत नसल्यामुळे मी समाधानी नाही, अशा शब्दात वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

आयुष प्रसाद म्हणाले “कोविड केअर सेंटर सुविधा देणाऱ्या खासगी हॉस्पिटलने ऑनलाईन नोंदणी करावी. त्यांना एका दिवसात परवानगी दिली जाईल. दर पंधरा दिवसाने त्यांना पेमेंट दिले जाईल. भीमाशंकर हॉस्पिटलचे पेमेंट सोमवारी केले जाईल.

“मंचर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस आणि एक्स-रे टेक्निशियन उपलब्ध करून दिला जाईल,” असे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक नांदापूरकर यांनी सांगितले. आंबेगाव-शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, आंबेगावचे सभापती संजय गवारी, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागिय अधिकारी तथा तहसीलदार आंबेगाव रमा जोशी, जुन्नरच्या तहसिलदार लैला शेख, खेड विभागाचे उपविभागिय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, आंबेगाव गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिरूर गटविकास अधिकारी बाळासाहेब ढेकळे, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. चंदारांणी पाटील, डॉ. नितीन देवमाने, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीरंग फडतरे, डॉ.सचिन शिंदे, डॉ.राहुल फडके, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार आदींनी या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com