कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!

Suraj_Chopde
Suraj_Chopde

बारामती (पुणे) : वेळ दुपारी चारची... बारामतीतील नीरा डावा कालव्याच्या वसंतनगरनजिक असलेल्या भरावावर पतंग उडवित युवक बसलेले असतात, तेवढ्यात एक महिला दोन मुली आणि एका मुलासह कालव्याच्या भरावावर येते. महिला त्या मुलीला कालव्यात टाकण्याची अँक्शन करते, मुलांच्या अंगावर काटा येतो... पण त्यांना वाटत की ती मुलीला भीती दाखवत असावी, पण क्षणार्धात ती महिला त्या मुलीला पाण्यात टाकते आणि पाठोपाठ स्वत:ही त्या पाण्यात उडी घेते. 

पूर्ण क्षमतेने वाहत असलेल्या नीरा डावा कालव्याच्या पाण्याला जोरदार ओढ असते, त्यामुळे पोहता येत नसलेल्या या मायलेकी वेगाने वाहून जाऊ लागतात, त्या वेळी काठावरची दोन्ही मुले आईचे हे कृत्य पाहून कावरी बावरी होतात. आईने मुलीला पाण्यात टाकल्याचे पाहताच अगदी जवळच असलेल्या सूरज किसनराव चोपडे या मुलाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता कालव्याच्या पाण्यात उडी घेतली. पहिल्यांदा मुलीला त्याने पकडले आणि पाठोपाठ वाहून चाललेल्या आईलाही त्याने बाहेर ओढत आणले. 

ही घटना इतकी क्षणार्धात घडली की कालव्याच्या काठावर असलेल्या सूरज याच्या मित्रांनाही काही समजलेच नाही, पण माय लेकींना सूरजने सुखरूप पाण्याबाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वैफल्यग्रस्त असलेल्या मातेने स्वत:सह मुलांचेही जीवन संपवण्याचा निर्णय घेत हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र, 'देव तारी त्याला कोण मारी' असे म्हणतात, त्या उक्तीप्रमाणेच सूरज देवदूत बनून या मायलेकींच्या मदतीला धावून आला आणि त्याने त्या दोघींचेही प्राण वाचविले.

नंतर पोलिसही आले होते, त्यांनी त्या दोघींनाही दवाखान्यात नेले, मात्र, या सर्व गडबडीत त्या दोघींचे नाव सूरज याला मिळालेच नाही, आज सकाळी त्या दोघी दवाखान्यातून निघून गेल्याचे समजले. सूरजने जी समयसूचकता दाखवून या दोघींचे प्राण वाचविले, त्यामुळे त्याचे बारामतीकरांकडून कौतुक होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com