डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया आणखी सोपी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांची क्‍लिष्टता दूर करण्यासोबतच चार टप्पे निश्‍चित केले आहेत. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे १५ हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

पुणे - सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांची क्‍लिष्टता दूर करण्यासोबतच चार टप्पे निश्‍चित केले आहेत. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे १५ हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

विकसकांनी बांधलेल्या इमारती आणि जमिनीच्या मालकी हक्‍काचे हस्तांतरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; परंतु पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांपैकी केवळ दहा टक्‍के सोसायट्यांचेच डिम्ड कन्व्हेयन्स झाले आहे. विकसकांकडून टाळाटाळ, सोसायट्यांची उदासीनता आणि कागदपत्रांची क्‍लिष्टता ही त्याची कारणे आहेत. या संदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला; परंतु विकसकांकडून इमारतींसह जमीन हस्तांतरणाच्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा नव्याने अध्यादेश जारी करून ही प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

असे करा डिम्ड कन्व्हेयन्स 
टप्पा १ - जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात विहित नमुना ७ मध्ये कागदपत्रांसह अभिहस्तांतरणाचा मसुदा दस्तासह अर्ज करावा. तेथून मानीव अभिहस्तांतरणाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.

टप्पा २ - मानीव अभिहस्तांतरणाच्या मसुद्याचा दस्त सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्क तपशिलासह सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकृत निर्णय करून घेणे.

टप्पा ३ - आदेश प्राप्त झाल्यानंतर तो दस्त दुय्यम निबंधक (खरेदी- विक्री) यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे.

टप्पा ४ - नोंदणीकृत दस्तानुसार नगर भूमापन अधिकारी, मंडल अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे अभिलेखात सातबारा नाव नोंदणीसाठी अर्ज करावा. अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नाव नोंदविल्यावर मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाइन अर्जासोबत द्यावयाची कागदपत्रे 
    मानीव अभिहस्तांतरणासाठी नमुना ७ मधील अर्ज
    मानीव अभिहस्तांतरण प्राप्त झाल्याच्या नमुना ७ ची प्रत
    संस्थेतील एका सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत, इंडेक्‍स २ किंवा मालकी हक्‍काचा पुरावा 
    विकसकाने मंजूर करून घेतलेल्या ले-आउटची अंतिम मंजूर नकाशा प्रत

ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे
    मानीव अभिहस्तांतरणासाठी नमुना ७ मधील अर्ज
    सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र, डीड ऑफ डिक्‍लरेशनची प्रत
    अर्जदार संस्थेचा तपशील, वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेतील ठरावाची प्रत
    मिळकतपत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा 
    सर्व सदनिकाधारकांची विहित नमुन्यातील यादी
    सोसायटीने अभिहस्तांतरण करून देण्यासाठी प्रवर्तकाला बजावलेली नोटीस
    बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, तसेच भोगवटा प्रमाणपत्र
    भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे पत्र. मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेकडे भोगवटा प्रमाणपत्र अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र 
    दोन हजार रुपयांची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन शुल्क
    संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्व-प्रतिज्ञापत्र

Web Title: Dimend Convention process is much simpler