निवडणूक लढविण्याचे शरद पवार यांचे सूतोवाच 

निवडणूक लढविण्याचे शरद पवार यांचे सूतोवाच 

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत मी पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातील माझ्या प्रमुख सहकाऱ्यांचा असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकाऱ्यांच्या आग्रहाचा विचार करीन, असे शुक्रवारी (ता. 8) स्पष्ट केले. त्यामुळे पवार हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात आज बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेससोबतची संभाव्य आघाडी, जागावाटप, आघाडीतील मित्रपक्ष, "राष्टवादी'साठीचे सोयीचे मतदारसंघ आणि पक्षाकडील तगडे उमेदवार यासंदर्भात पवार यांनी उपस्थित नेत्यांशी चर्चा केली. 

या पुढील काळात लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे पवार यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार यांनीही निवडणूक लढविण्याच्या मागणीने पक्षातून जोर धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारले असता; पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, ""मी निवडणूक लढवावी, अशी पक्षातील सहकाऱ्यांची अपेक्षा आहे. त्यात विजयसिंह आणि अन्य काही मंडळींनी मी माढ्यातून लढावे, असे सुचविले आहे. परंतु, माझी इच्छा नाही. तरीही आम्ही तुमचे ऐकतो, त्यामुळे आता तुम्ही आमचे ऐकावे, असे सहकारी म्हणत आहेत. त्यामुळे आता मी त्यांच्या अपेक्षेचा विचार करेन.'' 

दरम्यान, माढा मतदारसंघातून पवार यांनी 2009 मध्ये निवडणूक लढविली होती. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढविली होती. या मतदारसंघात "राष्ट्रवादी'ला मानणारा मतदार आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारस संघात शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणूक लढविण्याची गरज नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी सहा प्रबळ उमेदवार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे या मरदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? याची उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com