शिवसेनेच्या दोन गटांतील वाद विकोपाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पुणे - शिवसेनेच्या नेत्यांनी दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत कार्यकर्तेही घुसल्याने वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली, त्यामुळे गुरुवारी दिवसभर शहर शिवसेनेमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता.

पुणे - शिवसेनेच्या नेत्यांनी दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत कार्यकर्तेही घुसल्याने वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली, त्यामुळे गुरुवारी दिवसभर शहर शिवसेनेमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आणि महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि माजी उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. हे वाद मिटविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी काल रात्री शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांना बोलविले होते. मात्र ही खबर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना कळली. त्या वेळी एका नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे, असा आग्रह धरला. तेव्हा नेत्यांनी त्या कार्यकर्त्यांना झटकले. त्यातून वाद सुरू झाला. 

त्यामुळे वैतागलेल्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यातून हा वाद वाढतच गेला. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले, तेव्हा कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 

या संदर्भात शिवसेना नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. घरातील भांडणे आहेत, लवकरच ती मिटतील, असेही त्यांनी सांगितले. परंतु आज दिवसभर शहर शिवसेनेमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes between two Shiv Sena groups