गडकोटांचे दरवाजे खुले!; पंधरापेक्षा कमी सदस्य असलेल्या ग्रुपला मान्यता

district administration finally gave permission for the trek
district administration finally gave permission for the trek

पुणे - जिल्ह्यातील गडकोटांवर गिरिभ्रमण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर परवानगी दिली. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, १५ पेक्षा जास्त मोठा ग्रुप नको, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत, अशा अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करूनच ट्रेकिंग करावे, असे आवाहन केले आहे.

शहरातील मॉल, बागा, हॉटेल्स, बार तसेच पर्यटनस्थळे खुली झाली; तरी ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात ट्रेकिंगचा हंगाम असतो. त्यामुळे ‘सकाळ’ने या विषयाला १९ ऑक्‍टोबर रोजी वाचा फोडली होती. त्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन सादर केले, तर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार डॉ. देशमुख यांनी ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. तसेच, या आदेशाची माहिती त्यांनी केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभाग, राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनाही कळविली आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्येही ट्रेकिंगला परवानगी देण्याचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे; तर नाशिक, रायगड या जिल्ह्यांतही ट्रेकर्सने तेथील जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, ट्रेकिंग आरोग्यदायी असते, हे लक्षात घेऊन परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनासह सरकारने घातलेल्या अटींची पूर्तता करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असेल.

ट्रेकर सतीश मराठे म्हणाले की, सह्याद्रीमधील ट्रेकिंग हा महाराष्ट्रातील तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याबद्दल ‘सकाळ’चे आम्ही आभार मानतो. 

पावत्यांचे प्रकार बंद करा
दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन जोशी म्हणाले की, ट्रेकिंग सुरू झाले, ही समाधानाची बाब आहे. आता स्थानिक ग्रामपंचायती ट्रेकर्सची अडवणूक करणार नाहीत, याकडे जिल्हा पोलिस आणि प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, काही ग्रामपंचायती प्रशासनाच्या नावावर ट्रेकर्सकडून प्रत्येकी ५०० रुपयांच्या पावत्या फाडतात. हा प्रकार तातडीने बंद करण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. 

पुणे जिल्ह्यातील किल्ले 
पुणे जिल्हा आणि परिसरात सुमारे ३५ किल्ले आहेत. राजगड, तोरणा, रायरेश्‍वर, सिंहगड, लोहगड, विसापूर, राजमाची, ढाक, जीवधन, हडसर, विचित्रगड आदी किल्ले ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहेत; तर नागफणी, भातराशीचा डोंगर, कार्ला येथील डोंगर आदी गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेकिंग करताना हे नियम पाळा
    एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नको 
    ट्रेक सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग आवश्‍यक 
    १० वर्षांच्या आतील मुले आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना बंदी 
    ताप, सर्दी, खोकला आणि कोरोनासदृश लक्षणे असलेल्यांना ट्रेकिंगला बंदी 
    स्थानिकांच्या घरांत मुक्काम करू नका 
    एकमेकांच्या वस्तू (मोबाईल, कॅमेरा आदी) हाताळू नका 
    प्रत्येकाला मास्क बंधनकारक 

गेल्या सात महिन्यांपासून अनेक जण घरात बसून होते. ट्रेकिंगच्या माध्यमातून तंदुरुस्ती राखली जाते, हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता जबाबदारी ट्रेकर्सची आहे. त्यांनी सर्व अटींची पूर्तता करावी. 
- उमेश झिरपे, अध्यक्ष, महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com