जिल्हा बॅंक-एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची परीक्षा १३ मे या एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची परीक्षा १३ मे या एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

आयोगामार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या अंतर्गत ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे. एकूण ४४९ जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी (एएसओ)- २८ जागा, वित्त विभागातील विक्रीकर निरीक्षक (एसटीआय)-३४ जागा आणि गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय)- ३८७ जागांकरिता १३ मे रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे, तर जिल्हा बॅंकेतील क्‍लार्क पदासाठीच्या ३९३ जागांसाठीही याच दिवशी परीक्षा होणार आहे. २०१२ नंतर बॅंकेची परीक्षा होत आहे. 

या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी बॅंकेकडे केली आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा पालन करावेच लागेल, असे बॅंकेचे म्हणणे आहे.

पीडीसीसी बॅंकेने परीक्षा पुढे ढकलावी
‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि पीडीसीसी बॅंकेच्या क्‍लार्क पदासाठीची परीक्षा या दोन्हीसाठी अर्ज केला आहे; परंतु या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे मला कोणती तरी एकाच परीक्षा द्यावी लागणार असून एक संधी हुकणार आहे. त्यामुळे पीडीसीसी बॅंकेने परीक्षा पुढे ढकलावी, अशी आमची मागणी आहे.’’
- अमोल केसकर, विद्यार्थी

Web Title: District Bank-MPSC Exam on the same day