पुण्यातील शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी; एवढा निधी केला मंजूर

naval-kishore-ram
naval-kishore-ram

पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा नियोजन समितीतून पुणे जिल्हा परिषदेला १० कोटी २२ लाख २६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ निधीअभावी रखडलेली ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे  येत्या आठवडाभरात प्रत्यक्षात ही सर्व कामे सुरू होऊ शकणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तुर्तास केवळ शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठीच निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुर्तास पडझड झालेल्या ग्रामपंचायत मुख्यालय व स्मशानभूमी शेडची कामे निधीअभावी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व सरकारी इमारती आणि स्मशानभूमी शेडच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपये खर्च येणार यानुसार जिल्हा परिषदेने येणाऱ्या खर्चाइतक्या निधीची मागणी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे केली होती. 

पुणे जिल्ह्यात २ जूनला हे निसर्ग चक्रीवादळ आले होते.  या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ३१६ प्राथमिक शाळा, १५७ अंगणवाड्या, १५ ग्रामपंचायती, १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, एक पशुवैद्यकीय दवाखाना आणि  २२ स्मशानभूमी शेडचे नुकसान झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे एस्टिमेटस (खर्चाचे अंदाजपत्रक) तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविली होती आणि या वादळानंतर आठच दिवसात या सर्व अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यानंतर १० जूनला निधी मागणी प्रस्ताव  जिल्हाधिकारी राम यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

दुरुस्तीची कामे व मंजूर निधी
-  प्राथमिक शाळा ---- २७८ ---- ७ कोटी ७७ लाख.
- अंगणवाड्या --- १९९ --- २ कोटी २४ लाख ९८ हजार.
- आरोग्य केंद्र ---- ४१ ---- १६ लाख ९१ हजार.
- एकूण कामे ---- ५१८ ---- १० कोटी २२ लाख २६ हजार.

स्थायी समितीत अभिनंदन
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संकट चालू आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी अधिकाधिक निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीतही पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या आजच्या स्थायी समितीच्या सभेत या दोघांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी हा ठराव मांडला. त्यास ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले.

कोरोना संकटामुळे नवीन प्रशासकीय मंजूरीना अर्थ विभागाने बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा अजित पवार आणि राम यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून हा निधी तत्काळ मंजूर केला आहे. यामुळे येत्या आठवडाभरात शाळा व अंगणवाड्या दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.
- रणजित शिवतरे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com