
जिल्हा न्यायालय दोन शिफ्टमध्ये
पुणे : कोरोनामुळे एकाच शिफ्टमध्ये सुरू असलेले पुणे जिल्हा न्यायालयातील कामकाज आता पुन्हा दोन शिफ्टमध्ये चालणार आहे. मंगळवारपासून जिल्हा न्यायालयातील कामकाज पुर्ववत झाले असून कॅन्टीन, बार रूम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वकील पक्षकारांची गर्दी वाढली आहे.
उच्च न्यायालयाने पुणे येथील सर्व न्यायालयांसाठी परिपत्रक जारी केले असून १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालये सुरू करण्याबाबत आदेश दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्च महिन्यात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे न्यायालयातील कामकाज एका शिफ्टमध्ये सुरू होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा दोन शिफ्टमध्ये सुरू केले होते. मात्र, एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात परत एकदा लॉकडाउन लागू केले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर राज्यातील बहुतांश आस्थापना सुरू केल्या. मात्र, जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमेतेने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमेतेने सुरू करण्याबाबत पुणे बार असोसिएशनने पुढाकार घेतला होता. न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळा वाढविण्याबाबत पुणे बार असोसिएशनने वकिलांचे म्हणणे मागवले होते. त्यामध्ये बहुतांश वकीलांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून न्यायालयातील कामकाजाच्या वेळा वाढवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुणे बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाला याबाबत निवेदन दिले होते.
"जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमेतेने सुरू झाले असले तरी कोरोनामुळे नियमांचे पालन प्रत्येकाने करायचे आहे. न्यायालयात येताना मास्क परिधान करणे, न्यायालयीन कक्षात गर्दी न करणे यासह अन्य नियमांचे पालन करायचे आहे."
- अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन