घटस्फोट नाही; पुन्हा नांदा सौख्य भरे!

सनील गाडेकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

त्याने दिला आनंदाच्या क्षणांना उजाळा 
पत्नीने पुन्हा नांदायला यावे म्हणून अशोकने त्यांच्या आयुष्यात घडलेले सर्व आनंदाचे क्षण न्यायालयात सांगितले. उलटतपासणीदरम्यान अशोकने सांगितलेल्या सर्व चांगल्या प्रसंगांची आणि घटनांची कोमलने कबुली दिली. परंतु तिला स्वतःचा दावा सिद्ध करण्यासाठी कुठलेही पुरावे देता आले नाहीत.

पुणे - नवऱ्याचे आधीच एक लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. मुलगा व बायको असे दोघेही त्याच्याबरोबर आहेत. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देऊन घटस्फोटाची मागणी करणारा पत्नीचा दावा न्यायालयाने फेटाळला. पत्नीने दोन महिन्यांच्या आत परत नांदायला जावे, असा निकाल कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी दिला. 

घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानंतर जोडपे एकत्र येण्याच्या शक्‍यता कमी असतात. मात्र न्यायालयाने अशा प्रकारचा निकाल दिल्याने विभक्त होण्याच्या वाटेवर असणारे जोडपे पुन्हा एकत्र येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की अशोक आणि कोमल यांचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने कोमल एका वर्षानंतर वेगळी राहू लागली. जून २०१४ मध्ये तिने अशोक विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. त्या खटल्यात अशोक हजर न राहिल्याने न्यायालयाने कोलमच्या बाजूने निकाल दिला. दरमहा १० हजार रुपये पोटगी आणि २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने अशोकला दिले. मात्र तिने पोटगी घेतलीच नाही.

त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये घटस्फोटाचा दावा दाखल केला. अशोकचे आधीच एक लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. मुलगा आणि बायको दोघेही त्याच्याबरोबर आहेत, असा आरोप कोमलने केला होता. 

कोमलला घटस्फोट हवा होता तर अशोकने पुन्हा नांदायला येण्याचा अर्ज केला होता. पतीने फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करायचा असतो तरच लग्न रद्द होऊ शकते. तसेच कोमलने केलेल्या आरोपांबाबत कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे न्यायालयाने अर्ज फेटाळल्याची माहिती अशोकचे वकील भूषण कुलकर्णी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divorse Family Life Court